कमी पावसाचा फटका; आवक कमी झाल्याने सोलापुरातील पालेभाज्या महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:27 PM2021-08-10T18:27:57+5:302021-08-10T18:28:03+5:30
मेथीला ग्राहकांची पसंती : दर वाढल्यामुळे महिलांकडून सुरू आहे काटकसर
सोलापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण तरीही शहर व जिल्ह्यात पावसाने कमीच हजेरी लावली आहे. कमी पावसाचा फटका शेतीमालाला बसत आहे. यामुळे सोलापूर मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच ते आठ रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आता दहा ते पंधरा रुपयांना मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. परिणामी प्रत्येकजण आता काटकसर करत आहे. त्यात आता पालेभाज्यांचे दर वाढत असल्याने महिलांची काटकसर करताना ओढाताण होत आहे. पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्या या स्वस्त असल्यामुळे अनेक ग्राहक हे फळभाज्या घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. फळभाज्यांमध्ये कारली ४० रुपये, मिरची ५० रुपये, भेंडी ३० ते ४० रुपये, सिमला मिरची ३० ते ४० रुपये, कोबी २० रुपये किलो दराने मिळत आहे. तसेच बटाटे पंधरा ते वीस रुपयांना किलो मिळत आहेत.
पालेभाज्यांचे भाव...
- मेथी १५
- पालक १०
- चुका ८
- कोथिंबीर १५
- पुदीना १०
- शेपू १०
कर्नाटकातून येत आहेत पालेभाज्या
जिल्ह्यात पालेभाज्यांची आवक कमी होत असल्यामुळे अनेक भाजी विक्रेते हे कर्नाटकच्या सीमेवरील इंडी तालुक्यामधून पालेभाज्या आणून विकत आहेत. तेथून शेपू, पालक, मेथी आदी भाजीपाला येत आहे. तसेच पुणे येथूनही गाजर, काकडी आदी फळभाज्यांची आवक वाढत आहे. पालेभाज्यांची आवक कमी असल्यामुळे जेव्हा शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी येतो, तेव्हा व्यापाऱ्यांची खरेदीसाठी गर्दी झालेले चित्रही पाहायला मिळत आहे.
फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या महाग मिळत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सर्व पालेभाज्या या पाच ते दहा रुपयांना जुडी मिळत होत्या. पण आता मेथी, शेपू पंधरा ते वीस रुपयांना मिळत असल्याने आम्ही फळभाज्या घेत आहोत.
- लता गायकवाड, ग्राहक
जेवणात पालेभाज्यांना खूप महत्त्व आहे. कारण पालेभाज्यांमुळे आरोग्य निरोगी राहते. पालेभाज्या जरी महाग झाल्या असल्या तरी, नाईलाजाने का होईना, आम्हाला खरेदी कराव्या लागतात.
- मंगल भोईटे, ग्राहक
सध्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यात पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. पण ग्राहक दर कमी करून मागत आहेत. यामुळे कधी कधी ग्राहकांना नाराज करू नये, यासाठी आणलेल्या दरात आम्हाला द्यावे लागते.
- अर्जुन हांडे, भाजी विक्रेता