कमी पावसाचा फटका: युरोप, अफ्रिकेतून परदेशी पाहुणे सोलापुरात; हिरज, नान्नज, बोरामणीत मुक्काम
By शीतलकुमार कांबळे | Published: October 21, 2023 12:26 PM2023-10-21T12:26:05+5:302023-10-21T12:27:02+5:30
दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस येणारे परदेशी पक्षी यंदा उशिरा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात येत आहेत.
सोलापूर : या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम हा माणसांसोबतच सर्वांवर होत आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस येणारे परदेशी पक्षी यंदा उशिरा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात येत आहेत.
वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे सदस्य हिरज, होटगी तलाव, नान्नज व बोरामणी माळरानावर, चपळगाव येथे पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. तिथे त्यांना भरपूर प्रमाणात स्थानिक व परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षणासहित नोंदी घेण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सप्टेंबरअखेरीस होत असते. थंडी उशिरा सुरू होत असल्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत आहे.
पक्ष्यांचे खाद्य शेतातील ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन या पिकांवर लागणारी कीड, कीटक, टोळ हे प्रमुख आहे. त्यामुळे हे पक्षी शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारी अखेरीपर्यंत असते.
स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, अजित चौहान, ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, नीलेश भंडारी, विनय गोटे, शिवानी गोटे, सूरज धाकपाडे, सिद्धांत चौहान, आदींनी घेतल्या.
येथून येताहेत परदेशी पाहुणे -
पश्चिम घाट, युरोप, कजाकिस्तान, पाकिस्तान, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, चीन, मंगोलिया अशा अनेक देशांतून पक्षी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. चिमणी इतक्या आकारापासून रोहित पक्ष्यासारख्या आकारापर्यंत असलेले पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.