पोहताना कमरेची ट्युब सुटली, पाण्यात बुढून पुतण्याचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Published: May 14, 2023 12:35 AM2023-05-14T00:35:55+5:302023-05-14T00:36:08+5:30
शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला तालुक्यातील घटना
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: कमरेला ट्युब बांधून शेततळ्यात पोहायला शिकवत असताना अचानक ट्युब सुटली आणि १५ वर्षीय पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पृथ्वीराज तानाजी बाबर (वय १५, रा. वाघमोडे वस्ती) असे मृत पुतण्याचे नाव असून ही घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सांगोला तालुक्यात आलेगाव येथे वाघमोडे वस्तीवर घडली. याबाबत दत्तात्रय पांडुरंग बाबर यांनी पोलिसात खबर दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार आलेगाव येथील चुलते दत्तात्रय बाबर व पुतण्या पृथ्वीराज बाबर हे दोघे मिळून शेततळ्यात पोहण्यास गेले होते. पुतण्या पृथ्वीराज यास पोहता येत नसल्याने त्यांनी त्याच्या पाठीवर ट्युब बांधली आणि तो पोहू लागला. त्यानंतर ते घरी आले. थोड्या वेळाने पुतण्या पृथ्वीराज घरी काही येईना म्हणून ते परत शेततळ्याकडे धावले असता तो शेततळ्यात पोहताना दिसला नाही. मात्र त्याच्या कमरेला बांधलेली ट्युब पाण्यात तरंगत असलेली दिसून आली. त्यांनी त्याचा शोध घेतला असता पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. तात्काळ खाजगी वाहनाने त्यास बेशुद्ध अवस्थेत सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषीत केले.