माउली शुगरने अदा केली एकरकमी एफआरपीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:23 AM2020-12-31T04:23:07+5:302020-12-31T04:23:07+5:30
सोलापूर : तडवळ येथील माउली शुगर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी २१०० रुपये प्रतिटन ...
सोलापूर : तडवळ येथील माउली शुगर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी २१०० रुपये प्रतिटन जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन साहेबराव पाटील यांनी दिली.
यंदाच्या या गळीत हंगामासाठी उसाला माउली शुगरने २०८४ रुपये प्रतिटन एफआरपी जाहीर केली आहे. त्यानुसार एकरकमी २१०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारी जमा करण्यात आले. ही रक्कम एफआरपीपेक्षा अधिक आहे . १५ नोव्हेंबरपर्यंत कारखान्याला ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या रकमा बँक खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. यानंतर दर पंधरवड्याला बिलाच्या रकमा ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात नियमितपणे जमा करण्यात येणार आहे.
मागील गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम कारखान्याने वेळच्यावेळी अदा केली आहे. कारखान्याकडे कोणतीच थकबाकी नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या रकमा संबंधित येत्या आठवडाभरात अदा करण्यात येणार आहेत. कारखान्याचे गाळप सुरळीतपणे सुरू असून, शेतकऱ्यांना रकमा देताना कोणतीही अडचण नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर एस.ए. पाटील उपस्थित होते.
-------
१ लाख ८० हजार मे. टन गाळप
यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने एक लाख ८० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून एक कोटी ६४ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. त्यातील एक कोटी पाच लाख युनिट विजेची विक्री करण्यात आली आहे.
--------
कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू आहे. यंदा विक्रमी गाळप करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत ऊस बिलाच्या रकमा जमा केल्या जातील.
- सीए व्ही.पी. पाटील,
- चेअरमन
माउली शुगर, तडवळ