माढा मतदारसंघात म्हणे, लढ बापू.. ‘दक्षिण’वाले म्हणे, ‘जाऊ द्या ना बापू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:26 PM2019-03-18T12:26:08+5:302019-03-18T12:32:28+5:30
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ सोडू नये या मागणीसाठी सोलापूर शहर आणि ...
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ सोडू नये या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समर्थकांनी रविवारी दुपारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केले़ विशेष म्हणजे यावेळी काही कार्यकर्त्यांनी देशमुखांचे पायही धरले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुरुनाथ कुलकर्णी यांनी त्यांची समजूत काढली आणि या भावना पक्षनेतृत्वाला कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली.
सहकारमंत्री सुभाष देशमुख माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता़ ही खदखद व्यक्त करण्यासाठी रविवारी सकाळी दक्षिण सोलापूर भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, यतीन शहा, श्रीशैल व्हनमाने यांच्यासह काही सरपंच होटगी रोडवरील सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले़ त्यांचे पुत्र मनीष देशमुख यांच्याकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ जर बापू माढ्यात उभारणार असतील तर आधी आमचे राजीनामे घ्या, असे निक्षून सांगितले आणि फोना-फोनी सुरु झाली़ हळूहळू कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आणि त्यांचा मोर्चा संपर्क कार्यालयाकडे वळला.
सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांपर्यंत ही चर्चा गेली. तासाभरात संपर्क कार्यालयासमोर मंडप उभारण्यात आला आणि कार्यकर्ते उपोषणाला बसले.
महापौर शोभा बनशेट्टी, दक्षिण सोलापूरच्या सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप टेळे, उत्तर सोलापूरच्या सभापती संध्याराणी पवार, उपसभापती रजनी भडकुंबे, शहराध्यक्ष प्रा.अशोक निबर्गी, नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, राजश्री बिराजदार, सुभाष शेजवाल, संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, सचिन कल्याणशेट्टी, आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, इंद्रजित पवार, श्रीमंत बंडगर, प्रशांत क डते, अण्णाराव बाराचारे, शिरीष पाटील, एम.डी. कमळे, हणमंत कुलकर्णी, कारंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या विनायक सुतार, काशिनाथ कदम यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले.
या घटनेची माहिती मिळताच सहकारमंत्री देशमुख उपोषण स्थळी धावून आल़े त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़ ‘माढा नको, दक्षिण हवे’ ही एकच घोषणा देत होत़े ‘आमचे राजीनामे मंजूर करा आणि मग माढ्याला जा’ अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी तर साष्टांग दंडवतच घातला़ या प्रकाराने देशमुख चकित झाले़ ‘मला अडचणीत आणण्याचा उद्योग करू नका़’ असे बजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ ठरला़ जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि प्रदेश भाजपाचे रघुनाथ कुलकर्णी आले त्यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वाढलेल्या गर्दीने आम्हाला न्याय द्या असा एकच धोशा लावला़
वल्याळ यांनी केलेली चूक बापूंनी करु नये
- नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले, लिंगराज वल्याळ शहर उत्तर विधानसभा सोडून लोकसभेसाठी उभे राहिले. त्यानंतर शहर उत्तरची जागा काँग्रेसकडे गेली. ही चूक बापूंनी करु नये. यावेळी नगरसेवक राजेश काळे यांनी आपल्या मनपा सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्याकडे दिला. नगरसेवक सुभाष शेजवाल, श्रीनिवास करली यांनीही राजीनामा देण्याचा इशारा दिला. तुम्ही माढ्याकडे गेला तर भाजपा कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, असेही ते म्हणाले.