आमदारकीचा षटकार.. ‘बबनदादां’च्या नेतृत्वाला पुनश्च धार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:31 PM2019-10-25T12:31:40+5:302019-10-25T12:37:22+5:30

Madha Vidhan Sabha Election Results 2019: माढ्याचं रणांगण : संजय कोकाटेंचे एकाकी लढतीचे आव्हान व्यर्थ; मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या १४ गावांतूनही मताधिक्य

Madha Election Results 2019: babandada shinde vs Sanjay kokate, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | आमदारकीचा षटकार.. ‘बबनदादां’च्या नेतृत्वाला पुनश्च धार !

आमदारकीचा षटकार.. ‘बबनदादां’च्या नेतृत्वाला पुनश्च धार !

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्वप्रत्येकवेळी त्यांच्या मताधिक्याचा आलेख हा चढताच राहिलाशिवसेनेचे संजय कोकाटे यांनी एकाकी लढत देऊन निर्माण केलेले आव्हान कामी आले नाही

डी.एस. गायकवाड 

माढा : गेल्या २५ वर्षांपासून मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांवर शिक्कामोर्तब करून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांना सहाव्यांदा विक्रमी मतांनी विजयी केले आहे तर शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी एकाकी लढत देऊन निर्माण केलेले आव्हान कामी आले नाही.

आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तेव्हापासून ते सतत सहाव्यांदा विजयी झाले आहेत. प्रत्येकवेळी त्यांच्या मताधिक्याचा आलेख हा चढताच राहिला आहे. यावेळी एकास-एक लढत होऊनही त्यांनी आतापर्यंतचे आपलेच रेकॉर्ड मोडीत काढून तब्बल ६७ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. हा एक विक्रम आहे.
मागील २५ वर्षांत सत्तेच्या माध्यमातून केलेली विकासकामे, ५ पंचवार्षिक निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव, निवडणूक लढविण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची साधनसामुग्री, प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आवश्यक असणारे उपलब्ध मनुष्यबळ या सर्व बाबी आमदार बबनराव शिंदे यांच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

सर्वात महत्त्वाचे आमदार शिंदे यांचा साखर कारखानदारी व मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून सामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क व त्यांच्याबद्दल असलेला विश्वास, गावोगावी असलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांचे जाळे,  या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणूनच आमदार शिंदे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत .

माढा मतदारसंघातील सर्वच गावातील लोकांशी त्यांचा थेट संपर्क असल्यानेच त्यांना माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या १४ गावांमधूनही अकराशे मतांचा लीड मिळाला आहे. मोहिते-पाटील मात्र हजारांचे मताधिक्य संजय कोकाटे यांना देण्याचे जाहीर सभांमधून सांगितले होते, परंतु लीड तर सोडाच उलट शिंदे यांनाच मताधिक्य मिळाले आहे हे अनाकलनीय आहे .
आमदार बबनराव शिंदे यांना माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सर्वच गावातून मताधिक्य मिळाले आहे. स्वत: आमदार बबनराव शिंदे यांनीही आपण ३० ते ३५ हजार मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होऊ असे म्हटले होते, परंतु प्रत्यक्ष मात्र त्यांच्या अपेक्षेपेक्षा डबल मताधिक्य मिळाले आहे. या सर्व घडामोडीत कोणता फॅक्टर प्रभावी ठरला याची चर्चा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसह संजय कोकाटे यांचेही कार्यकर्ते करीत आहेत .

 मत विभागणी टाळण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यात आमदार शिंदे यांचे सर्वच विरोधक यशस्वी ठरले. यावेळी मोहिते-पाटील, परिचारक, काळे, सावंत या ज्येष्ठांसह तालुक्यातील शिवाजी कांबळे, प्रा. शिवाजी सावंत,भारत पाटील, प्रा. सुहास पाटील यांच्यासह अनेक शिंदे विरोधक हे निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात एकत्र होते. माजी आमदार धनाजी साठे व संजय पाटील-भीमानगरकर यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली होती, परंतु जसजशी निवडणूक पुढे सरकत गेली तसतसे मोहिते-पाटील माळशिरस मतदारसंघात, परिचारक गट पंढरपूर मतदारसंघात, सावंत कुटुंबीय परांडा-भूम मतदारसंघात अडकून पडले,काळे गट प्रचारात फारसा सक्रिय झालेला दिसला नाही.

ज्या मातब्बर नेत्यांच्या विश्वासावर शिवसेनेचे संजय कोकाटे निवडणूक लढवत होते त्या सर्वांनीच झोकून प्रचार केला नाही किंवा त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे संजय कोकाटे एकाकी पडले. केवळ शिवाजी कांबळे, प्रा.सुहास पाटील, पृथ्वीराज सावंत यांना घेऊनच प्रचारात सामोरे जावे लागले.

अपुरी यंत्रणा अन् हेवेदावे कोकाटेंना नडले
- संजय कोकाटे यांची नवखी उमेदवारी, हाताशी असलेली तोकडी प्रचार यंत्रणा, कोणत्याही मोठ्या नेत्यांचा प्रचारात नसलेला सहभाग, एकमेकांतील हेवेदावे, प्रचारात नसलेली सुसूत्रता अपुरा मॅनपॉवर यामुळे संजय कोकाटे यांना एकला चलो रे भूमिकेतूनच एका मातब्बर उमेदवारांशी एकाकी झुंज द्यावी लागली. त्यामुळे परिवर्तनाची सुप्त लाट असूनही त्याचा फायदा कोकाटे यांना झाला नाही. जनतेने पुन्हा एकदा आमदार शिंदे यांच्याकडेच सहाव्यांदा सत्ता सोपवली आहे.

माळशिरसची मते मायनस 
- माळशिरस तालुक्यातील १४ गावामधून १७ हजारांचे लीड तर सोडाच उलट अकराशे मते मायनस झाली आहेत हाच या मतदारसंघातील कळीचा मुद्दा ठरला आहे. येथे नेमके काय झाले असा प्रश्न लोकांना पडला आहे.

Web Title: Madha Election Results 2019: babandada shinde vs Sanjay kokate, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.