भाजपची डोकेदुखी वाढणार! मोहिते पाटलांना कट्टर विरोधकाने दिली साद; म्हणाले, दोन लाख मतांचं लीड देतो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:43 AM2024-04-12T00:43:50+5:302024-04-12T00:48:33+5:30
Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे रात्री भाजपाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyshil Mohite Patil ) माढा लोकसभा मतदारसंघातून निवडूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता मोहिते पाटील यांचे विरोधक असणारे उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना साद घातली आहे. यामुळे आता भाजपाची (BJP) डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
माढ्यात रात्रीच राजकीय घडामोडींना वेग! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
उत्तर जानकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोहिते पाटील यांना साथ द्यायची कार्यकर्त्यांची मानसिकता असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. उत्तम जानकर म्हणाले, जी जनतेची भावना असते तीच भावना कार्यकर्त्यांची असते.आमचं शिष्ठमंडळ गेल्याच आठवड्यात जाऊन त्यांच्याशी चर्चा करुन आलं. पण, आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान झाल्याचं मला अजून दिसत नाही. आमच्या कार्यकर्त्यांची एक भावना झाली आहे की तुम्ही विधानसभा अपक्ष लढा, लोकसभा अपक्ष लढा किंवा मोहिते पाटील यांच्यासोबत युती करा. किंवा काहीही करा अशा पद्धतीची भावना या तालुक्यात आहे. आता जर आम्ही एकत्र आलो तर दोन लाखांच लीड यावेळी मिळू शकतं, असंही उत्तम जानकर म्हणाले.
उत्तम जानकर यांनी भाजपाकडे सोलापूर लोकसभा उमेदवारीची मागणी केली होती. पण सोलापूरची उमेदवारी आमदार राम सातपुते यांना मिळाली, यामुळे उत्तम जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे आता जानकर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे जानकर यांनी सांगितले. जर मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आले तर माळशिरस तालुक्यातून दीड ते दोन लाखांचे मताधिक्य मिळेलं असंही जानकर म्हणाले.
माढ्यात रात्रीच राजकीय घडामोडींना वेग!
माढा लोकसभा मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तर दुसरीकडे रात्री भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. हा भाजपासाठी पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जात आहे.