माढा लोकसभा; राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांची ४९ कोटी ३३ लाखांची मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:12 PM2019-04-04T14:12:18+5:302019-04-04T14:17:17+5:30
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि कुटुंबीयांच्या नावे ४९ कोटी ३३ लाख ६ हजार ४१५ रुपयांची मालमत्ता आहे.
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि कुटुंबीयांच्या नावे ४९ कोटी ३३ लाख ६ हजार ४१५ रुपयांची मालमत्ता आहे. यात विविध कारखान्यांचे शेअर्स, ठेवी आणि जमिनींचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना संजय शिंदे यांनी शपथपत्र दाखल केले आहे. यात उत्पन्नासह मालमत्तांचा समावेश आहे. संजय शिंदे यांचे २०१३-१४ या आर्थिक वर्षातील उत्पन्न ९२ लाख २६ हजार ७११ होते तर २०१७-१८ वर्षातील उत्पन्न ९२ लाख ६५ हजार १२५ आहे. पत्नी सविता शिंदे यांचे २०१३-१४ वर्षातील उत्पन्न ३१ लाख ३३ हजार ४२१ होेते. त्यांचे २०१७-१८ मधील उत्पन्न २८ लाख ६६ हजार ३८१ आहे. मुलगा यशवंत शिंदे यांचे २०१३-१४ वर्षातील उत्पन्न शून्य होते. आता २०१७-१८ मधील उत्पन्न २० लाख २३ हजार ८४२ आहे.
संजय शिंदे यांच्या नावे विविध बँकांमध्ये ७४ लाख ४१ हजार ५६३ रुपयांची रोकड आहे. पत्नी सविता शिंदे यांच्या नावे ३ लाख ६२ हजार ६८२ रुपयांची रोकड आहे. मुलगा यशवंत यांच्या नावावर ७ लाख ३० हजार ४३९ रुपयांची रोकड आहे. तर आई सोजरबाई यांच्या नावे १६ हजार ३७७ रुपयांची रोकड आहे. संजय शिंदे यांच्या नावे असलेल्या जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य २४ कोटी ६३ लाख ४७ हजार ८९१ आहे. यामध्ये पाच लाख रुपयांच्या बंदुकीचा समावेश आहे. त्याचबरोबर २१ लाख रुपयांची स्पीड बोट, एक ट्रॅक्टर याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे ८५० गॅ्रम सोन्याचाही समावेश आहे. संजय शिंदे आणि कुटुंबीयांच्या एकूण जंगम मालमत्तेचे मूल्य ३४ कोटी ९२ लाख ५१ हजार ४१५ रुपये आहे. शिंदे कुटुंबीयांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य १४ कोटी ४० लाख ५५ हजार रुपये आहे. यात विविध ठिकाणच्या जमीन व मालमत्तांचा समावेश आहे.
संजय शिंदे यांच्या नावावर एकूण ९ कोटी ६८ लाख ६८ हजार ९१० रुपयांचे देणे आहे. यासह कुटुंबीयांच्या नावावर एकूण ११ कोटी २४ लाख १७ हजार ४४० रुपयांची देणी आहेत. संजय शिंदे यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात दोन खटले प्रलंबित आहेत. यात करमाळा विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल झालेल्या खटल्याचाही समावेश आहे. हा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे.