अखेर शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; मोहिते पाटील 'तुतारी'च वाजवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 05:53 PM2024-03-27T17:53:40+5:302024-03-27T17:57:26+5:30
Madha Loksabha Election 2024 : गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने राज्यातील पहिल्याच यादीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.
Madha Loksabha Election 2024 : भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे अकलूजचे मोहित पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धैर्यशील मोहिते पाटील 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे. यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. उद्या अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील खासदार शरद पवार यांची मुंबई भेट घेणार असून उद्याच पक्ष प्रवेश कऱणार असल्याचे बोलले जात आहे.
"१००० कोटींचा घोटाळा, संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची डायरेक्टर"
गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने राज्यातील पहिल्याच यादीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली, या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला होता, तर काही दिवसापूर्वी अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मोहित पाटील वेगळा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आज जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
'आम्ही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार'
"मी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी असं चार महिन्यापूर्वीच म्हटले होतं. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत.आम्ही काल त्यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या पक्षात रहा. आता आम्ही सर्वांनी शरद पवार यांच्या पक्षात जायचं ठरवलं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही जनमत घेतलं, असंही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.