माढा तालुक्यातील वाळू माफियांनी केला कुर्डूवाडी प्रांत अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
By Appasaheb.patil | Published: March 21, 2024 04:12 PM2024-03-21T16:12:30+5:302024-03-21T16:12:38+5:30
प्रांत अधिकाऱ्यांची गाडी व पथक पाहून अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेले चार ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह चालक पळवू लागले, परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत मोठे धाडस दाखवत मोठ्या शिताफितीने त्यांना थांबविले.
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : केवड (ता.माढा) येथील सीना नदीतील वाळू उपसा करून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे चोरून नेहत असल्याच्या तक्रारी कुर्डूवाडी विभागाच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी स्वतःच पथक तयार करत वाळू कारवाईत सामील होत बुधवारी पहाटेच्या सुमारास केवड येथील सिना नदीत अचानकपणे वाळू तस्करांवरती धाड टाकली. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांची गाडी व पथक पाहून अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेले चार ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह चालक पळवू लागले, परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत मोठे धाडस दाखवत मोठ्या शिताफितीने त्यांना थांबविले.
दरम्यान, त्यातील तीन ट्रॅक्टर चालकाकडून ट्रॅक्टर प्रांताच्या अंगावर घालत मागील ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू प्रांत अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून पथकातील मंडल अधिकारी व तलाठ्याने प्रांत अधिकाऱ्यांना बाजूला ओढले त्यात त्या बालंबाल वाचल्या आहेत. यानंतर चारी ट्रॅक्टरचे चालक आहे तेथून धूम ठोकली. कुर्डूवाडी विभागाच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहेत. त्यातील तीन रिकामे तर एक ट्रॉली वाळूने भरलेल्या स्थितीत पथकाच्या हाती आली आहे. कारवाईदरम्यान ट्रॅक्टर व ट्रेलर जागेवर सोडून चालकांनी धूम ठोकल्यानंतर पथकातील कोतवाल व तलाठ्यांनी चारही ट्रॅक्टर स्वतः चालवित माढा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह मंडल अधिकारी विशाल गायकवाड, सूर्यकांत डिकोळे, तलाठी प्रवीण बोटे, निलेश मुटकुटे, लक्ष्मण मोगल, नवनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, अतुल दहीटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.