15 लाख रुपये घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पिशव्या घेऊन माधव भंडारी यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:26 PM2018-10-28T16:26:33+5:302018-10-28T16:30:51+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपुरात अनोखे आंदोलन
पंधरा लाख घेण्यासाठी कार्यकर्ते पिशवी घेऊन माधव भंडारीकडे
पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. चार वर्षे उलटून गेली तरी अजून पंधरा रुपये देखील जनतेच्या खात्यात जमा झालेले नाहीत. असे सांगत पिशव्या सोबत घेऊन आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्याकडे 15 लाख रुपये देण्याची मागणी करत अनोखे आंदोलन केले.
भंडारी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दुपारी पंढरपुरात दाखल झाले. कार्यक्रमापूर्वी शासकीय विश्रामगृहात ते आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह चर्चा करत बसले होते.
त्यावेळी तिथे अचानकपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, शरद प्रतिष्ठानचे श्रीकांत शिंदे, सुरज पेंडोर, सुमित गायकवाड, विजय मोरे, प्रवीण यादव, आनंद कथले आदी कार्यकर्ते आले.
हे सर्व कार्यकर्ते स्वतःच्या हातामध्ये पिशव्या सोबत घेऊन आले होते नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले 15 लाख रुपये अजून आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत हे पैसे नेण्यासाठी आम्ही आत्ता सोबत पिशव्या घेऊन आलो आहोत असे म्हणून पिशव्या दाखवून आश्वासनाप्रमाणे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा अचानक झालेल्या अशा आणि च्या अनोख्या आंदोलनामुळे मंडळीदेखील काही क्षण अवाक झाले. त्यांनी आपल्याकडे देण्यासाठी पंधरा रुपये देखील नाहीत मी खासगी कामानिमित्ताने आलो आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तिथे उपस्थित असलेल्या आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले त्यानंतर हे अनोखे आंदोलन संपले.