माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By appasaheb.patil | Published: February 5, 2020 10:38 AM2020-02-05T10:38:17+5:302020-02-05T10:39:06+5:30
पंढरपुरात हरी नामाचा गजर; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर फुलले
सोलापूर : माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्निक केली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.
माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची काकडा आरती ४ वाजता झाली. त्यानंतर पहाटे ४.१५ ते ५.१५ या कालावधीत विठ्ठलाची नित्यपूजा श्री व सौ विठ्ठल जोशी यांनी केली.
मंदीर समितीच्यावतीने एकादशी निमित्त पदस्पर्श दर्शन रांगेत उपवासाचे पदार्थ व मोफत चहापाण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली. नित्यपूजेस मंदीर समितीचे सदस्य माधवी निगडे, शंकुतला नडगिरे व मंदीर समितीचे सल्लागार सदस्य सुनिल रुकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदीर समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.