सोलापुरातील वीज ग्राहकांना महावितरणचा शॉक; साडेपाच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By Appasaheb.patil | Published: February 7, 2024 03:30 PM2024-02-07T15:30:44+5:302024-02-07T15:30:58+5:30
आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.
सोलापूर : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर होत आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ५७ हजार ७९६ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला असून ५ हजार ५९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
वारंवार आवाहन किंवा विनंती करूनही जे थकबाकीदार थकीत वीजबिलांची रक्कम भरण्यास दाद देत नाहीत त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.