निवडणूक लढविण्यासाठी अवतरले झळकीचे महाराज; म्हणाले मला शिंदेंविरूध्द लढायचे आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 07:58 PM2019-03-18T19:58:09+5:302019-03-18T20:00:15+5:30
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात हिंदुस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी आणखीन एक महाराज समोर आले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील झळकी ...
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात हिंदुस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी आणखीन एक महाराज समोर आले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील झळकी येथील व्यंकटेश महास्वामी असे त्यांचे नाव असून, अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांनी फॉर्म दाखल करण्यासंदर्भात समक्ष माहिती जाणून घेतली.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी आवश्यक असणारी तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे बैठकीत व्यस्त होते. अशातच मला सोलापूर लोकसभा निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी काय अपेक्षित असणार आहे याची माहिती हवी आहे, असे सांगत व्यंकटेश महास्वामींनी जिल्हाधिकाºयांचे दालन गाठले. जिल्हाधिकारी यांनाच भेटण्यासाठी ते सायंकाळी उशिरापर्यंत येथे उपस्थित होते.
महाराज म्हणाले, उमेदवारी भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना आपला विरोध नसून, आमच्या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आहे. महाराजांनी जनतेची सेवा आपल्या कामातून दाखवून द्यावी, असे मत व्यंकटेश महास्वामी यांनी पत्रकारांसमोर बोलताना व्यक्त केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसतानाही अचानक साधूच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयात महाराज आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाºयांना उत्सुकता व आश्चर्य वाटत होते. नेमके हे महाराज आहेत तरी कोण व कोणत्या ठिकाणचे याबाबत यावेळी उत्सुकता दिसून येत होती.
शिंदेंविरुद्ध लढायचे आहे !
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध मला निवडणूक लढवायची आहे.