करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:10 AM2024-11-22T11:10:36+5:302024-11-22T11:22:54+5:30
करमाळा विधानसभा मतदार संघात महायुती ज्या शिंदे सेनेकडून दिग्विजय बागल महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून नारायण पाटील, तर अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
Karmala Vidhan Sabha ( Marathi News ) :करमाळा विधानसभा निवडणुकीत ३ लाख २८ हजार ९९४ मतदारांपैकी २ लाख २९ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ६९.७२ टक्के मतदान झाले. मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांतून झालेले मतदान निवडणूक निकालात निर्णायक ठरणार आहे.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांना कुर्डूवाडीसह ३६ गावांतील मताधिक्यामुळेच विजय मिळवता आला होता. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत मागच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत टक्केवारी घसरली असली, तरी मतदान वाढले आहे. करमाळा विधानसभा मतदार संघात महायुती ज्या शिंदे सेनेकडून दिग्विजय बागल महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून नारायण पाटील, तर अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. २००९ ला ६६.५७ टक्के, २०१४ ला ७२.७३ टक्के, २०१९ ला ७१.०५ टक्के मतदान झालेले होते.
या निवडणुकीत ६९.७२ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ७१ हजार ५१५ असून, त्यापैकी १ लाख २३ हजार ५१७ मतदान झाले, तर महिला मतदारांची संख्या १ लाख ५७ हजार ४६८ आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार ८५३ मतदान झालेली आहे. या निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का वाढलेला असून लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांनी उत्साहाने मतदान केल्याने त्याचा फायदा तिरंगी लढतीत कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुर्डूवाडी शहरात २३ हजार ६०० पैकी १२ हजार ७५६ मतदान झाले. कुर्डूवाडी शहरात घसरलेला टक्का तिरंगी लढतीत कोणाला फायदेशीर ठरणार, तर अपक्ष प्रा. रामदास झोळ यांना किती मतदान मिळते. झोळ यांच्या मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार, यावर निकाल अवलंबून आहे.