मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:07 AM2024-11-19T10:07:47+5:302024-11-19T10:08:24+5:30

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून बुधवारी सायंकाळी ६ पर्यंत प्रशासनाकडून सायलेंट पिरियड जाहीर झाला आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Devendra Fadnavis did not hold a single meeting in Solapur | मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या

मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या

Solapur Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. गेल्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेऊन मैदान गाजवले. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होम मैदानावर सभा घेतली. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री जगदीश शेट्टार, बसवनगौडा पाटील आदींनी सभा घेतल्या. आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे यांच्यासाठी तेलुगू अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आमदार चित्रा वाघ यांनीही सभा घेतल्या. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार ठरवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मागील निवडणुकीत त्यांनी बार्शी, अक्कलकोटमध्ये सभा घेतल्या. यंदा मात्र त्यांची एकही सभा झाली नाही. 

उद्धवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरात सभा घेतली. ठाकरेंनी सांगोला, बार्शीमध्ये सभा घेतल्या. शिंदेसेनेचे सांगोल्यातील उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. मुख्यमंत्र्यांनी बार्शी, करमाळ्यातील उमेदवारांसाठी वेळ दिला. काँग्रेसचे पंढरपूरचे उमेदवार भगीरथ भालके, शहर मध्यचे चेतन नरोटे, अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सभा घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे उमेदवार यशवंत माने यांच्यासाठी टाकळी सिंकदरला सभा घेतली. या सभेतून करमाळ्यातील अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यासाठी संदेश दिला. माळशिरसचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी व्हिडीओ पाठवला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र पंढरपूर मतदारसंघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यासाठी सभा घेतली.

'एमआयएम'चे शहर मध्यचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्यासाठी पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली. पोलिसांना त्यांना नोटीस दिली होती. या नोटिशीवर त्यांनी टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर दक्षिणचे उमेदवार संतोष पवार यांच्यासाठी पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेऊन महायुती, आघाडीवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश निरीक्षक शेखर माने, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांनी शहर उत्तर मतदारसंघात महेश कोठे यांच्यासाठी सभा घेतल्या. माढ्यात अभिजित पाटील, मोहोळमध्ये राजू खरे यांच्यासाठी या नेत्यांनी वेळ दिला.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून बुधवारी सायंकाळी ६ पर्यंत प्रशासनाकडून सायलेंट पिरियड जाहीर झाला आहे. या काळात जिल्ह्यात सर्वत्र ड्राय डे राहणार असून उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सोमवार सायंकाळी ६ वाजल्यानंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही. रॅली, सभा किंवा प्रचार वाहने फिरवता येणार नाहीत. प्रचार संबंधित सर्व वाहनांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांना केवळ तीनच वाहने वापरता येणार आहेत. मतदान केंद्राबाहेर गर्दी वाढल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय करण्यात येईल.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Devendra Fadnavis did not hold a single meeting in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.