पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:22 PM2024-11-22T15:22:26+5:302024-11-22T15:23:25+5:30

मनसेच्या इंजिननेही वेग वाढविण्याचा प्रयत्न केल्याने जय-पराजयाचा मार्ग कुणाचा सुखकर होणार, याबाबत चर्चा आहे. 

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 New MLA to decide major 30 villages including Pandharpur Mangalvedha | पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

Pandharpur Vidhan Sabha ( Marathi News ) :पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्यामध्येच होत आहे. या निवडणुकीत चुरशीने जवळपास ७० टक्के मतदान झाले असून, पोटनिवडणुकीपेक्षा जवळपास ३५ हजारांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हा वाढलेला टक्का पंढरपूर- मंगळवेढ्याचा नवीन आमदार ठरविणार आहे. शेवटच्या टप्प्यात अर्थपूर्ण घडामोडी घडत तुतारीचा आवाजही निघाला आहे. तर मनसेच्या इंजिननेही वेग वाढविण्याचा प्रयत्न केल्याने जय-पराजयाचा मार्ग कुणाचा सुखकर होणार, याबाबत चर्चा आहे. 

पुनर्रचनेनंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सलग तीनवेळा स्व. आ. भारत भालके यांनी विजय मिळविला होता. २०२१ साली भारत भालकेंच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेतही भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत सर्व विरोधकांना एकत्र करत भगीरथ भालकेंचा धक्कादायक पराभव केला. 

सन २०१९ च्या निवडणुकीत तब्बल २ लाख ४० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पोटनिवडणुकीत तो २ लाख २४ हजारांवर आला. आता त्यामध्ये वाढ होऊन तो २ लाख ६० हजारांपर्यंत पोहोचला आहे. पोटनिवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील २२ गावे व शहराने भगीरथ भालकेंना साथ दिली होती; तर मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात आवताडेंना तारले होते.

मंगळवेढा व पंढरपूर शहरात काँग्रेस व भाजपाने आपापला पारंपरिक मतदार टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असली तरी आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मतदानापूर्वी असलेले मतभेद पक्षीय पातळ्यांवर मिटविण्यात यश आले असले तरी ते शेवटपर्यंत मिटले नसले चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे जुने मतदार स्वतःसोबत राहतील का, याची खात्री दोन्ही पक्षांना शेवटपर्यंत देता आली नाही.

पंढरपूर-मंगळवेढा शहरासह ३० गावांची निर्णायक मते 

मंगळवेढा ग्रामीणमध्ये नंदेश्वर, हुलजंती, मरवडे, आंधळगाव, रहे, बोराळे, लक्ष्मीदहिवडी, ब्रह्मपुरी, गोणेवाडी, भाळवणी, माचणूर, बठाण, तामतर्डी, भोसे, बोराळे, सिद्धापूर, आसबेवाडी, कचरेवाडी, अरळी, तर पंढरपूर ग्रामीणमध्ये कासेगाव, गादेगाव, वाखरी, इसबावी, अनवली, खर्डी, टाकळी, कौठाळी, शिरढोण, तनाळी, गोपाळपूर, शिरगाव, आदी मोठी गावे दोन्ही उमेदवारांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावतील, असे चित्र आहे.

आघाडीत बिघाडी, महायुतीत बेबनाव कोणाच्या पथ्यावर? 

या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये सरळ लढत होईल, असे असताना आघाडीत बिघाडी होत दोन उमेदवार देण्यात आले; तर महायुतीतही नाराजी नाट्यानंतर परिचारक, आवताडे यांचे मनोमिलन झाले असले तरी ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे चित्र आहे. महायुतीतील असलेल्या सावंत परिवाराचा उमेदवार असल्याचा फटका आघाडीला बसणार की महायुतीला यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 New MLA to decide major 30 villages including Pandharpur Mangalvedha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.