आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:01 PM2024-10-24T13:01:05+5:302024-10-24T13:02:21+5:30

महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shekap Jayant Patils reaction on sangola | आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

Sangola Vidhan Sabha Election ( Marathi News ) : "सांगोल्याची जागा जर लढवणार नसेल, तर शेकाप कोणतीच जागा लढवणार नाही. आम्ही आमचे अधिकार शरद पवार यांना दिले आहेत. त्यांनीच सांगितले आहे की, सांगोल्यात आमचा पाठिंबा शेकापला राहील. त्यामुळे ते  सांगतील त्याप्रमाणे होईल. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार नसतील. आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहोत," असं स्पष्टीकरण शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगोल्यात दिलं. 

सांगोला विधानसभेसाठी शेकापकडून स्व. गणपत आबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना अधिकृत उमेदवारी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, शहाजी बापूंचे बजेट मोठे असणार आहे. आम्ही पैशाला पुरे पडणार नाही. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, आबासाहेबांच्या पश्चात नेतेमंडळी आमची चेष्टा करीत होती. त्यांचे विचार निष्ठा सोडून नेते मंडळी इकडून तिकडून गेली. मात्र, ज्याला लढायचे आहे. त्यांनी तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढावे. केवळ कोणीही डरकाळ्या फोडू नये, रिंगणात उतरावे. 

डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले, आम्हा देशमुख कुटुंबात वादच नव्हता. विरोधकाकडून आमच्यात मतभेद असल्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमिषे दाखवली गेली; परंतु आबासाहेबांनी कार्यकर्त्यांची बांधलेली मोळी आम्ही दोघे सहजासहजी सोडणार नाही. समोर कोण आहे याची चिंता आम्हाला नाही.

महाविकास आघाडीत वाद

सांगोला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून शेकापला सुटणार म्हणत शेकापने डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करत 'मातोश्री'तून एबी फॉर्म मिळाल्याने सांगोल्याच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shekap Jayant Patils reaction on sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.