सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 04:06 PM2024-10-30T16:06:07+5:302024-10-30T16:06:35+5:30
सोलापूर जिल्ह्यात शहर उत्तर, मध्य, दक्षिण, मोहोळ, पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी लक्ष वेधून घेतले.
Solapur Politics ( Marathi News ) : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सहापेक्षाही अधिक पक्ष असल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड बंडखोरी झाली. सोलापूर जिल्ह्यात शहर उत्तर, मध्य, दक्षिण, मोहोळ, पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी लक्ष वेधून घेतले. विधानसभेचे अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. दक्षिणमध्ये उद्धवसेनेचे अमर पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे दिलीप माने, काडादी, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी अर्ज भरला. पंढरपुरात काँग्रेसने भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात पवार गटाचे अनिल सावंत यांनी अर्ज भरला. शहर मध्यमधून शिंदेसेना सोडून स्वराज्य पक्षात गेलेले मनीष काळजे यांनी तर उत्तरमधून अमोल शिंदे यांनी अर्ज भरला. माढा तालुक्यात पवार गटाने अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात मीनल साठे यांना अजितदादा गटाने उमेदवारी दिली.
काँग्रेसने सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर केली होती; परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून एबी फॉर्म आला नाही. पक्षाच्या नेत्यांवर संताप व्यक्त करीत माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तसेच धर्मराज काडादी यांनीही बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. पंढरपुरात भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला. याचा राग म्हणून पवार गटाने अनिल सावंत यांचा एबी फॉर्मसह अर्ज भरला.
काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने, पंढरपुरातून भगीरथ भालके आणि शहर मध्य मतदारसंघातून चेतन नरोटे यांची उमेदवारी जाहीर झाली. दक्षिणमध्ये उद्धवसेनेकडून अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यात काँग्रेसने माने यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू झालेला वाद दिल्ली दरबारी पोहोचला. या वादात काँग्रेसच्या नेत्यांनी दक्षिणबाबत एक पाऊल मागे घेतल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून मंगळवारी सकाळी शहरातील नेत्यांकडे भालके आणि नरोटे यांचे एबी फॉर्म पोहोच झाले. दिलीप माने यांचा एबी फॉर्म येणार नसल्याचे सोमवारी रात्री स्पष्ट झाले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माने यांना निरोप देण्याचा प्रयत्न केला. . मात्र, रात्रीतून काहीतरी गडबड होईल म्हणून हा निरोप दिलाच नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिलीप माने समर्थकांची होटगी रोडवरील निवासस्थासमोर मंगळवारी सकाळी गर्दी झाली होती. भालके यांचा अर्ज पंढरपुरात पोहोच झाला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत भालकेंनी अर्ज भरला. माने समर्थक मात्र एबी फॉर्मची वाट बघत राहिले. दुपारी एक वाजता पक्षाकडून फॉर्म येणार नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे माने यांचे पुत्र पृथ्वीराज व इतर सहकाऱ्यांनी निवडणूक कार्यालय गाठले. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली. दुपारी दोन वाजता दिलीप माने कार्यालयात पोहोचले आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
सोलापूर शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (महायुती-भाजप) - बंडखोरी : शोभा बनशेट्टी, संजय साळुंखे, अमर बिराजदार (भाजप), अमोल शिंदे (शिंदेसेना) सोलापूर शहर उत्तर : महेश कोठे (मविआ-शरद पवार गट) - बंडखोरी - सुनील रसाळे (काँग्रेस) सोलापूर शहर मध्य : देवेंद्र कोठे (महायुती-भाजप) - बंडखोरी - श्रीनिवास संगा (भाजप), मनीष काळजे (शिंदेसेना) सोलापूर शहर मध्य : चेतन नरोटे (मविआ-काँग्रेस) - बंडखोरी - अंबादास करगुळे, शौकत पठाण (काँग्रेस), तौफीख शेख (शरद पवार गट) सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख (महायुती-भाजप) - बंडखोरी - श्रीशैल हत्तुरे (भाजप), मेनका राठोड (भाजप)
सोलापूर दक्षिण: अमर पाटील (मविआ- उध्दवसेना) - बंडखोरी - दिलीप माने, बाबा मिस्त्री (काँग्रेस), धर्मराज काडादी (काँग्रेस) मोहोळ : राजू खरे (मविआ-शरद पवार गट) - बंडखोरी - नागनाथ क्षीरसागर, संजय क्षीरसागर, रमेश कदम (शरद पवार गट) पंढरपूर : भगिरथ भालके (मविआ-काँग्रेस) - बंडखोरी - अनिल सावंत, वसंतराव देशमुख (शरद पवार गट) माढा : अभिजीत पाटील (मविआ-शरद पवार गट) बंडखोर - शिवाजी कांबळे (शरद पवार गट) माढा : मीनल साठे (अजित पवार गट) - बंडखोर - रणजितसिंह शिंदे (अजित पवार गट)