शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:34 PM2024-10-27T16:34:25+5:302024-10-27T16:36:15+5:30
शरद पवार नक्की कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती.
Mohol Vidhan Sabha ( Marathi News ) :मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स अखेर आज संपला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोहोळमधून सिद्धी रमेश कदम या आमच्या उमेदवार असतील असं जाहीर केलं. शरद पवारांच्या पक्षाकडून मोहोळमध्ये अनेक इच्छुक असताना पवारांनी कदम यांच्या मुलीला तिकीट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मोहोळमध्ये अजितदादा गटाकडून आमदार यशवंत माने यांनी अर्ज दाखल केला. पवार गटाकडून राजू खरे, संजय क्षीरसागर यांचे नाव चर्चेत होते. 'मी उमेदवार देतो, तुम्ही कामाला लागा...' असे सांगत पवारांनी इच्छुकांनी मतदारसंघात पाठवून दिले होते. त्यामुळे शरद पवार नक्की कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती. अखेर आज पवार यांनी याबाबतचा निर्णय घेत माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला तिकीट देण्याचे निश्चित केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सिद्धी कदम यांना तिकीट दिल्यानंतर आता पक्षातील इतर इच्छुक नक्की काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सोलापूरमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच
जिल्ह्यातील ११ मतदारसंघापैकी शहर उत्तर, अक्कलकोट या दोन मतदारसंघातील मुख्य लढतीचे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. आज मोहोळमधील चित्र स्पष्ट झाले असून उर्वरित आठ मतदारसंघातील भाजप, पवार गट आणि काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल संभ्रम कायम आहे. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. रविवारी रात्रीपर्यंत सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरमध्ये भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख विरुद्ध पवार गटाचे महेश कोठे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघात एमआयएमने उमेदवारी आहे. अर्ज भरला आहे. शिंदेसेनेचे अमोल शिंदे बंडखोरीच्या तयारीत आहेत. अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. एमआयएम उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.