महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार!
By विठ्ठल खेळगी | Updated: March 21, 2023 13:39 IST2023-03-16T18:37:41+5:302023-03-21T13:39:25+5:30
भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार!
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जापोटी ते कर्ज वसूल करण्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेने जप्त करुन ताब्यात घेतलेल्या ८२ हजार ५४३ क्विंटल साखरेची विक्री मंगळवार दि.२१ मार्च रोजी पुणे येथे करणार असल्याची निविदा नोटीस भिमा सह साखर कारखान्याला काढली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बँकेने कारखान्याला काढलेल्या नोटीसामध्ये नमूद केले आहे की, निविदा फॉर्म दिनांक १४ मार्च ते २० मार्च २०२३ पर्यंत भरावयाच्या असून , मालमत्ता पाहण्याची तारीख १६ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२३ पर्यंत आहे. निविदा प्रादेशिक कार्यालय पुणे येथे दाखल करण्याची अंतिम तारीख २० मार्चपर्यंत असून निविदा उघडण्याची तारीख २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता प्रादेशिक कार्यालय पुणे येथे उघडण्यात येणार आहे. राज्य बँक तारणातील ८२ हजार ५४३ क्विंटल साखर पोती सरफेसी कायदा कलम १३ (११) नियम ४ (३) नुसार ''जेथे आहे जशी आहे त्या परिस्थितीत विकणार आहे. वैधानिक नोटीस कर्जदारास सरफेसी कायदा २००२ अन्वये वैधानिक ३० दिवसाची साखर विक्री नोटीस दि.०४.१२.२०२१ अन्वये देण्यात आली आहे.
कारखान्याने राज्य बँकेचे थकीत कर्ज फेडले नाही म्हणून बँकेने कर्जाची वसुली करण्यासाठी या अगोदरही साखरेची विक्री करण्याची नोटीस काढली होती. यानंतर पुन्हा आता दुसरी नोटीस काढली असून सन २०१७ - १८ सालातील २८ हजार ७१२ क्विटल व सन २०१८-१९ सालातील ५३ हजार ८७१ अशी एकूण ८२ हजार ५४३ क्विंटल साखर २९६० रूपये प्रतिक्विटल दराने विक्री करण्याची नोटीस काढली आहे.