सोलापुरात पाऊस हरला, शाई जिंकली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:09 AM2019-10-22T04:09:47+5:302019-10-22T06:15:18+5:30
Maharashtra Election 2019: रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये पाणी साचले.
सोलापूर : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये पाणी साचले. ग्रामीण भागातील अनेक ओढ्या-नाल्यांना पूरही आला; मात्र मतदारांनी अशा पाण्यातूनही वाट काढत मतदानाचा हक्क बजावला़ त्यावेळी ‘पाऊस हरला अन् शाई जिंकली,’ असेच चित्र दिसून आले.
सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली़ त्यावेळी पाऊस होता. त्यामुळे पहिल्या दोन तासात केवळ दोन ते तीन टक्के मतदान झाले. नऊनंतर संततधार थांबल्याने लोक घराबाहेर पडू लागले़ साडेदहाच्या सुमारास शहरात मतदारांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या़
मुस्तीकरांनी काढली पुरातून वाट
अक्कलकोट मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील बेघर वस्तीला हरणा नदीच्या पुराच्या पाण्याचे वेढा घातला होता़ येथील मतदारांनी पुराच्या पाण्यातूनही वाट काढली अन् मतदानाचा हक्क बजावला़ माढा तालुक्यातील दहिवली येथे अपक्ष उमेदवार नारायण पाटील, वंचितचे अतुल खुपसे आणि संजय शिंदे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीही झाली. परिणामी पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणली़