Maharashtra Election 2019: होय, दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज; सुशीलकुमार शिंदे वक्तव्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:20 AM2019-10-10T04:20:58+5:302019-10-10T04:25:01+5:30
शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना शरद पवार हे ८० व्या वर्षी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सोलापूर: होय, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज असून, माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना शरद पवार हे ८० व्या वर्षी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता माझंही वय झालेले आहे. आम्ही थकलो आहोत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी टीकेची झोड उठविली आहे. त्याचबरोबर इतर पक्षाकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
यावर शिंदे म्हणाले, आम्ही आता थकलेले आहोत, हे वक्तव्य माझे वैयक्तिक असून याचा अर्थ भाजप किंवा मोदी यांच्यासाठी टक्कर देण्यासाठी आम्ही थकलेलो नाहीत. सत्ताधाऱ्यांसाठी लढा देण्यासाठी आम्ही अजून जवान आहोत. काँग्रेसमध्येही माझ्याप्रमाणे इतर अनेक ज्येष्ठमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर आमची ताकद वाढेल असे आजही मला वाटत आहे. विलीनीकरणाबाबत मी व्यक्त केलेल्या या मतावर ठाम आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यास ताकद वाढेल हे खरे आहे. विलीनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेली भावना चांगली आहे. पण सद्यस्थितीत असं घडणं कठीण वाटते. ज्या मुद्यावरून शरद पवार बाहेर पडले हे मान्य होणं कठीण आहे.
- बळीराम साठे,
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस