Maharashtra Kesari: शेवटच्या सव्वा मिनिटाने घात केला, विशालच्या कुटंबीयांस हुंदका झाला अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 02:46 PM2022-04-11T14:46:30+5:302022-04-11T14:46:44+5:30
कुस्तीचा छंद जोपासणाऱ्या विशालचे आजोबा दिवंगत रामहरी बनकर यांच्याकडून कुस्तीचं बाळकडू मिळालं.
माळशिरस : कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबई पूर्वच्या विशाल बनकर याच्यावर पाच विरुद्ध चार गुणांच्या फरकाने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर स्वत:चे नाव कोरले. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी गदा पटकाविण्याची किमया त्याने साधली तर जिगरबाज खेळणाऱ्या विशाल बनकरचा शेवटच्या सव्वा मिनिटाने घात केला. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात झाली. अंतिम फेरीत दोन तगडे पैलवान दाखल झाल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
कुस्तीचा छंद जोपासणाऱ्या विशालचे आजोबा दिवंगत रामहरी बनकर यांच्याकडून कुस्तीचं बाळकडू मिळालं. चुलते महाराष्ट्र केसरी दिवंगत तानाजी बनकर यांच्या बोटाला धरून विशालने सदाशिवनगर (ता. माळशिरस) च्या कर्मवीर व्यायामशाळेत कुस्तीचे धडे गिरवले. पुढे खवासपूर, कोल्हापुरातील गंगावेस तालमीत सराव सुरू असतानाच विशाल महाराष्ट्र केसरीच्या लढतीत अग्रेसर राहिला. माळशिरस तालुक्याला तब्बल ३५ वर्षांनंतर उपमहाराष्ट्र केसरीचा मान मिळवत घराण्याचा कुस्ती क्षेत्रावर ठसा उमटवला.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माळशिरस तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विशालच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.
असा झाला विशालचा प्रवास...
मांडवे (ता. माळशिरस) गावात राहत असलेल्या विशालचे प्राथमिक शिक्षण सदाशिवनगर येथे झाले. येथील व्यायामशाळेत कुस्तीचा सराव झाला. कुटुंबातील आजोबा, चुलते, वडील यांचा कुस्तीचा वारसा विशालला लाभला. यानंतर खवासपूर येथील व्यायामशाळेत वर्षभर सराव केला. दहावीच्या वर्षी विशालने महाराष्ट्र केसरीचे स्वप्न रंगवले व त्या दिशेने वाटचाल सुरू केली. यानंतर विशालच्या नावावर अनेक शालेय पुरस्कार नोंदले गेले. दोन वर्षे ९७ किलो वजन गटात महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा मान मिळाला. मात्र, महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेण्याचा मानस कायम ठेवत विशालचा सराव कायम राहिला.
तालुक्यातील कुस्तीला मोठी परंपरा आहे. आज अनेक मल्लांनी आयुष्य वाहून घेतले आहे. अनेक मल्ल कुस्तीचा सराव करत आहेत. तालुक्यात महाराष्ट्र केसरीची गदा पटकावण्याची संधी लाभल्याने पैलवानांचा आत्मविश्वास वाढला आहे.
- हनुमंत शेंडगे,
कुस्ती समालोचक
३५ वर्षांनंतर तालुक्याला मिळाली संधी अन् हुलकावणी
१९८८ मध्ये निमगाव गावचे सुपुत्र पै. छोटा रावसाहेब मगर यांनी पहिली महाराष्ट्र केसरीची गदा तालुक्यात आणली. १९८७ मध्ये मांडवे सदाशिवनगर गावचे सुपुत्र पै. तानाजी बनकर यांनी दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली होती. पै. तानाजी बनकर यांचाच पुतण्या पैलवान विशाल बनकर याला ३५ वर्षांनंतर पुन्हा तालुक्याच्या कुस्ती क्षेत्राचा उपमहाराष्ट्र केसरी पद पटकावण्याची संधी चालून आली; पण हुलकावणी दिली.
हुंदका झाला अनावर
पैलवानकी गाजवणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या विशालला महाराष्ट्र केसरीच्या स्वप्नाची वाटचाल करीत असताना आजोबा, चुलते महाराष्ट्र केसरी व वडिलांचे छत्र नियतीने हिरावले, त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर होता. यातच विशाल महाराष्ट्र केसरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला. एकीकडे दुःख व दुसरीकडे हुंदका कुटुंबाला अनावर झाला.
,