Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
By रवींद्र देशमुख | Published: April 30, 2024 12:51 PM2024-04-30T12:51:37+5:302024-04-30T12:52:47+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: पंधरा वर्षापूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्यानं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पाणी देण्याचे वचन दिलं होतं. मात्र, दिलेलं वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली.
- रवींद्र देशमुख
सोलापूर - पंधरा वर्षापूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्यानं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पाणी देण्याचे वचन दिलं होतं. मात्र, दिलेलं वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली.
माढा लोकसभेतील महायुतीचे उमदेवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरसमध्ये आयोजित सभेत मोदींनी पवारांवर टीका केली. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ६० वर्षांपूर्वी गरिबी हटविण्याचा नारा काँग्रेसने दिला होता. गरिबी.. गरिबी.. म्हणत जप करत होते. मात्र, गरिबी काय हटली नाही. दहा वर्षांपूर्वी येथील नेत्यांना कृषी मंत्री बनविले होते. तेव्हा ऊसाची एफआरपी २०० रुपये होती. आता तीच एफआरपी ३५० पर्यंत पोहोचली आहे. इथेनॉलच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करीत राहिले. विकासांकडे आणि शेतीमालाच्या दराकडे दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले.
'इंडी' आघाडीमध्ये ताळमेळ नाही. काँग्रेसकडे जवळपास २०० ते २५० जागांसाठी उमेदवार मिळाले नाहीत. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने राम मंदिर बांधलं नाही, अशा लोकांना जनता धडा शिकवेल, असे मोदी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.