मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:43 PM2024-10-09T12:43:43+5:302024-10-09T12:44:58+5:30
Sharad Pawar : शरद पवारांसमोर ६१ जणांनी मांडला लेखाजोखा
सोलापूर :विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवारी पुण्यात जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी, दादा गटाचे आमदार बबनराव शिंदे, पुतणे धनराज शिंदे यांच्यासह ६१ जणांनी मुलाखती दिल्या.
सोलापूर पवार गटाच्या पुण्यातील कार्यालयात मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा निरीक्षक शेखर माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील ११ १० पैकी मतदारसंघांत एकूण ६५ जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यापैकी ६१ जणांनी मुलाखती दिल्याचे माने यांनी सांगितले.
बार्शी, शहर उत्तरमधून दोघे
बार्शीतून विश्वास बारबोले, साहेबराव देशमुख तर शहर उत्तरमधून महेश कोठे, मनोहर सपाटे यांनी मुलाखत दिली. शहर मध्यमधून प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, यू.एन. बेरिया यांनी मुलाखत दिली.
पंढरपुरातून भालके, सावंत, देशमुखांसह १२ जण
पंढरपुरातून भगिरथ भालके, प्रथमेश पाटील, राहुल शहा, अनिल सावंत, सुभाष भोसले, वसंतराव देशमुख यांच्यासह १२ जणांनी मुलाखत दिली. सांगोल्यातून जयमाला गायकवाड, बाबूराव गायकवाड यांनी मुलाखत दिली. काँग्रेसच्या साठेंनी केला दावा महाआघाडीत करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील, संतोष वारे, रामदास झोळ, माळ्यातून संजय कोकाटे, काँग्रेसच्या मिनल साठे, शिवाजी कांबळे, संजय घाटणेकर, अनिल सावंत, बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकसभेला भाजपसोबत गेलेले अभिजित पाटील यांनीही मुलाखत दिली.
अन् चर्चेला सुरुवात
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आजवरच्या जागा वाटपात सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला, लोकसभेला धर्मराज काडादी हे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सहभागी होते. खासदार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना सोबत घेतले होते. दरम्यान, सोलापूर दक्षिणसाठी खासदार प्रणिती शिंदे आग्रही आहेत. दुसरीकडे धर्मराज काडादी यांनी पवार गटाकडून या मतदारसंघासाठी मुलाखत दिली. त्यामुळे नव्या चर्चाना तोंड फुटले. काडादी यांच्यानंतर दक्षिणमधून मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार यांनीही मुलाखत दिली.
उत्तम जानकर अनुपस्थित
माळशिरसमधून राजू साळवे, रणजित सरवदे, विकास धाईजे, धनंजय साठे, त्रिभुवन धाईजे, राजेश गुजर, चंद्रशेखर खडतरे यांनी मुलाखत दिली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उत्तम जानकर हेच आमचे उमेदवार असतील, असे म्हटले होते. परंतु, जानकर मुलाखतीला अनुपस्थित होते. जानकर लवकरच पक्ष प्रमुखांची भेट घेतील, असे निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.
ढोबळेंच्या मुलांचा दोन मतदारसंघांवर दावा
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित आणि कन्या कोमल डोबळे-साळुंखे यांनी मोहोळ, माळशिरस मतदारसंघातून मुलाखत दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा करणारे रॉकी बंगाळे, मुंबईतील सेना नेते राजू खरे यांनीही मोहोळसाठी मुलाखत दिली. याशिवाय माजी आमदार रमेश कदम, संजय क्षीरसागर, माजी महापौर सुशीला आबुटे यांच्यासह १६ जणांनी मोहोळसाठी मुलाखत दिली.
धर्मराज काडादी काय म्हणाले?
"महाआघाडीत सोलापूर दक्षिणची जागा कोणत्या पक्षाकडे जाईल माहिती नाही. मी राजकारणात पडणार नव्हतो. पण शरद पवार यांनीच मला यंदा निवडणूक लढवावी लागेल, असा निरोप दिला. त्यांच्या निर्देशानुसारच मी उमेदवारीसाठी मुलाखत दिली .
- धर्मराज काडादी, प्रमुख, सिद्धेश्वर साखर कारखाना