Maharashtra SSC Results 2018 : सोलापूरमधील सरपंचाचे लेकासह सेम टू सेम यश, दहावीत गुणही सारखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 09:05 AM2018-06-12T09:05:06+5:302018-06-12T09:05:06+5:30
माढा तालुक्यातील बाप लेक दहावीमध्ये सारखे गुण घेऊन पास झाले आहेत.
सोलापूर : दहावीचा निकाल आठ जून रोजी लागला. अनेकांनी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले. पण सोलापूरमधील बाप लेक दहावी पास झाल्यामुळे सध्या परिसरात त्यांची चवीने चर्चा सुरु आहे. माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील ढेकळे कुटुंबीयातील बाप लेक दहावीमध्ये सारखे गुण घेऊन पास झाले आहेत.
वडाचीवाडीचे 42 वर्षीय सरपंच शिवाजी ढेकळे आणि त्यांचा मुलगा विश्वजित दहावीमध्ये 500 पैकी 285 (57 टक्के) गुण मिळवून पास झाले आहेत. वर्षभर नियमित अभ्यास केल्यावर सरपंचाचा परीक्षा केंद्र माढ्यात आला, तर मुलगा विश्वजितचे परीक्षा केंद्र कुर्डुवाडी येथे आले. दोघांनीही अभ्यास करुन परीक्षा दिली आणि निकालादिवशी या दोघांनाही योगायोगाने 500 पैकी 285 (57 टक्के) असे सारखेच गुण मिळाले. याचा सर्वात जास्त आनंद सरपंचाच्या पत्नी राणीताई यांना झाला. गाववाल्यांनी सरपंच आणि त्यांच्या मुलाचा ग्रामपंचायत कार्यालयात जंगी सत्कार केला.
ढेकळे यांनी सरपंच झाल्यापासून गावाला स्मार्ट गावासह अनेक उपक्रमात बक्षिसे मिळवून दिली आहेत. हे सरपंच शिवाजीराव मात्र केवळ चौथी पास होते. यावर्षी त्यांनी 16 नंबरचा फॉर्म भरुन दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि ते पासही झाले.