महाराष्ट्राचे संघ अंतिम फेरीत
By admin | Published: December 30, 2014 10:56 PM2014-12-30T22:56:27+5:302014-12-30T23:25:11+5:30
राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा
इचलकरंजी : येथील जिम्नॅशियम मैदानावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये केरळ व महाराष्ट्राच्या मुलांच्या संघांनी आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, मुलांच्या छत्तीसगड संघाने आणि मुलींच्या हरियाणा संघाने तिसरा क्रमांक पटकावला.तिसऱ्या क्रमांकासाठी मुलींच्या गटात तमिळनाडू आणि हरियाणा, तसेच मुलांच्या गटात पंजाब विरुद्ध छत्तीसगड यांच्यात सामने झाले. त्यामध्ये हरियाणाने तमिळनाडूवर आणि छत्तीसगडने पंजाबवर विजय मिळविला. काल, सोमवारी सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य फेरीमध्ये मुलांच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड आणि पंजाब विरुद्ध केरळ, तर मुलींच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध तमिळनाडू आणि हरियाणा विरुद्ध कर्नाटक यांच्यात सामने झाले. यामध्ये मुलींच्या गटातून महाराष्ट्र व कर्नाटक, तर मुलांच्या गटातून केरळ आणि महाराष्ट्र या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात मुलांच्या गटात पंजाब विरुद्ध केरळ आणि महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड अशा लढती झाल्या. त्यामध्ये केरळने पंजाबचा एक डाव २ गुणांनी पराभव केला, तर महाराष्ट्रानेही छत्तीसगडवर एक डाव २ गुणांनी विजय मिळविला. मुलींच्या गटात कर्नाटक विरुद्ध हरियाणा ही लढत कर्नाटकने ५ गुणांनी जिंकली. महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यातील सामना एकतर्फी झाला. महाराष्ट्राने एक डाव १० गुणांनी तो जिंकला. अमृता कोकितकर हिने ४, विमल भोयरने ३ गडी बाद केले. (प्रतिनिधी)
इचलकरंजी येथे सुरू असलेल्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये पंजाब आणि छत्तीसगड या संघात सुरू असलेल्या सामन्यातील एक क्षण.