Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:03 AM2019-09-20T05:03:59+5:302019-09-20T05:04:22+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेण्याचा इशारा दिला.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - ncp finds the candidate for election | Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची

Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची

Next

- राकेश कदम
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेण्याचा इशारा दिला. पण आता निवडणुकीच्या काळात त्यांच्या पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. लोकसभा निवडणुकीपासून पक्षाचे एक-एक सरदार हा किल्ला सोडून चालले आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पाडून आपल्या तोफा या किल्ल्याच्या दिशेने वळविल्या.

परवा शरद पवार यांच्या मंचावर दाटीवाटीने बसलेले निम्मे लोक मोहिते-पाटील यांना भेटून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटलांच्या माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली आहेत. पण विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ आहे. मोहोळ या राखीव मतदारसंघातील माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे हे नेते तग धरुन आहेत. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत. मोहोळ आणि शहरातील नेत्यांनी शरद पवारांसमोर शक्तीप्रदर्शन केले. मोहोळमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. पण इतर मतदारसंघात आनंदी आनंद आहे.

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे भाजपच्या वाटेवर आहेत. शिंदे बंधूची मतदारसंघावर चांगली पकड आहे. माढ्यात शिंदे यांच्या विरोधात भाजप-सेनेकडून रणनिती आखली जात आहे. पण त्यात राष्ट्रवादीचे शिलेदार दूरदूरवर दिसत नाहीत. पवारांच्या सांगण्यावरुन काही कायकर्ते शिंदे बंधूंविरोधात निवडणूक लढवतील. आज पवारांशी वाद झाला तरी पुढे सहा महिन्यांनी शिंदे आणि पवारांचे सूत जुळू शकते, असा अनेक कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. सांगोल्यात मुळातच पक्षाची ताकद क्षीण आहे. त्यात पुन्हा या तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इथेही राष्ट्रवादीला नवा उमेदवार मिळणे अवघड आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस दोन कुटुंबांनी वाढवली. पण ती नंतर वेठीसही धरली. आता पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात राग निर्माण झाला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याला संधी द्या म्हणून काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर घोषणाबाजी केली. दीपक साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवी कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. शरद पवार पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेतो म्हणत असले तरी जुने सरदार नव्या शिलेदाराला बघून घेत आहेत.
>बार्शी आणि करमाळ्यात काय?
बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यानंतर वैरागचे निरंजन भूमकर आणि मकरंद निंबाळकर शरद पवारांना भेटून आले. मोहोळच्या बाळेराजे पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर डरकाळी फोडली. यापैकी भूमकर यांची उमेदवारी राष्ट्रवादीला सोपलांचे उट्टे काढण्यास पूरक ठरु शकते. पण राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार शर्यत जिंकण्याचे अंतर पार करु शकतील का? याबद्दल तालुक्यातील नेत्यांना शंका आहे. करमाळ््याच्या रश्मी बागल शिवसेनेपासून अनेक लोक पवारांना भेटून आले आहेत. त्यात निवडून येऊ शकेल, असा उमेदवार अद्याप तरी पक्षाला सापडलेला नाही. पंढरपूर, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट या भागातील पक्षाची ताकद गेल्या १० वर्षांपासून क्षीण होत आली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - ncp finds the candidate for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.