कूचबिहार क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा विजय; ३०८ धावांनी पाँडिचेरी संघाचा पराभव
By Appasaheb.patil | Published: November 26, 2023 04:58 PM2023-11-26T16:58:42+5:302023-11-26T16:58:55+5:30
या सामन्यात वैभव आघाम याने १८ चौकार, २ षटकार मारत शतकी खेळी करत ११६ धावा केल्या.
सोलापूर : येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियम सोलापूर येथे सुरू असलेला कुच बिहार ट्रॉफीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध पॉन्डुचेरी यांच्यात मागील दोन दिवसांपासून खेळविला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. तेंव्हा महाराष्ट्र संघाकडे २५० धावांची आघाडी होती. दुसरा डाव ५६ षटकात ४ गडी बाद १६२ धावांवर पुढे तिसऱ्या दिवशी सुरू झाला. महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात ९५ षटकात ८ गडी बाद ३०८ धावा केल्या. दरम्यान, महाराष्ट्र संघाने ३०८ धावांनी पॉडेचेरी संघावर दणदणीत मात करीत विजयी जल्लोष केला.
या सामन्यात वैभव आघाम याने १८ चौकार, २ षटकार मारत शतकी खेळी करत ११६ धावा केल्या. साहिल नाळगे ६० धावा आणि ओंकार राजपूत यांनी २५ धावांचे योगदान दिले. पाँडिचेरी संघाकडून अजय मारिया याने पुन्हा एकदा ५ बळी घेतले. महाराष्ट्र संघाने ४०३ धावांचे लक्ष्य पाँडिचेरी संघाला दिले. प्रतिउत्तर पाँडिचेरी संघ दुसऱ्या डावात ४० षटकात सर्वबाद ९८ धावाच करू शकला. यामधे राहुल यादव २४ धावा, राघवन याने २३ धावा आणि साहिल हरिराम याने १९ धावा केल्या.
महाराष्ट्र संघाकडून प्रतीक तिवारी आणि साहिल नाळगे यांनी भेदक गोलंदाजी करत पाँडिचेरी संघाचा डाव गारद केला. प्रतीक तिवारी याने २४ धावा देत ४ तर साहिल नाळगे ३ धावा देत ४ बळी घेतले तर स्वराज चव्हाण आणि योगेश चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन महाराष्ट्र संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.