महाराष्ट्राची हातभट्टी रातोरात कर्नाटकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:14+5:302021-04-21T04:23:14+5:30

अक्कलकोट : अक्कलकोट शहर व तालुक्यात तब्बल ८० ठिकाणी रासायनिक युक्त अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्र सुरू आहेत. या ...

Maharashtra's furnace to Karnataka overnight | महाराष्ट्राची हातभट्टी रातोरात कर्नाटकडे

महाराष्ट्राची हातभट्टी रातोरात कर्नाटकडे

Next

अक्कलकोट : अक्कलकोट शहर व तालुक्यात तब्बल ८० ठिकाणी रासायनिक युक्त अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्र सुरू आहेत. या माध्यमातून तयार झालेली दारू तालुक्यासह शेजारच्या कर्नाटक राज्याला सुद्धा पुरवठा केली जात आहे. सध्या देशी दारू दुकाने बंद असल्याने हातभट्टीला मागणी वाढली आहे.

अक्कलकोट तालुक्यात पूर्वीपासूनच हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. मध्यंतरी तत्कालीन डीवायएसपी उपाध्ये यांनी या विरोधात कडक धोरण घेतले होते. यामुळे हा प्रकार कंट्रोलमध्ये आला होता. त्यानंतर पुन्हा जोमाने सुरू झालेले अवैध हातभट्टी दारू आजही तेवढ्याच गतीने सुरु आहे. याला पोलीस खात्याकडून प्रतिबंध होत नसल्याची ओरड तालुक्यातील जनतेतून होत आहे.

दररोज लाखो लिटर हातभट्टी दारूची निर्मिती होते. याचे वितरण शेजारील कर्नाटकातील आळंद तालुका, मादन हिप्परगा, अफझलपूर, इंडी, कब्बण करजगी, आलमेल येथे रात्रीतून पाठविले जाते. याकडे महाराष्ट्र पोलिसांचे लक्ष नसल्यानेच हा प्रकार सर्रास सुरु असल्याची ओरड होत आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने हातभट्टी दारूला विशेषतः सीमावर्ती भागासह अक्कलकोट तालुक्यात मोठी मागणी वाढली आहे. दर सुद्धा नेहमीपेक्षा वाढवले आहेत. अक्कलकोट तालुक्यात चप्पळगाव, चुंगी, दहिटणेवाडी, शिरवळ, सांगवी, वागदरी, भुरीकवटे, गोगाव, खैराट, सलगर, चिक्केहळळी, निमगाव, बोरी उमरगे, मिरजगी, मैंदर्गी, दुधनी, सिंनुर, बिंजगेर, बबलाद, बोरोटी, तडवळ, करजगी, मंगरुळ, सुलेरजवळगे, हंजगी, बॅगेहळळी, जेऊर, अक्कलकोट स्टेशन, नागणसुर, नाविदगी, हैद्रा, आदी भागात दारू रातोरात पाठवले जाते.

----

या ठिकाणी आहेत हातभट्टी अड्डे

दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील नागूर तांडा-२०, भोसगे तांडा- ७, कलकर्जाळ -७, सुलेजवळगे -३, मुंढेवाडी -१, हिळळी -१, तडवळ -१, खानापूर -१, अक्कलकोट स्टेशन -२ अशा ३६ ठिकाणी तर

उत्तर पोलीस ठाणे हद्दीत अक्कलकोट शिवाजी नगर तांडा -३० ठिकाणी, बॅगेहळळी रोड -३, मार्केट यार्ड समोर -४, किणीमोड तांडा -७, अशा ४४ ठिकाणी अशा एकंदरीत ८० विविध ठिकाणी हातभट्टी दारू गाळली जात आहे. पोलीस खात्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. .

----

पोलिसांवर झाला होता हल्ला

मागील वर्षी कोरोना काळात भर उन्हाळ्यात दक्षिण पोलीस ठाण्याचे हद्दीतील पोलीस नागुरे तांडा येथे कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांना दारू निर्मिती तस्करांकडून रात्रीच्या वेळी हल्ला केला होता. कसेबसे पोलीस बालंबाल बचावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन जाऊन गुन्हा दाखल झालेल्या लोकांना अटक करण्यासाठी पळापळ केले. तेथील घटना संपूर्ण राज्यभर गाजली. त्यानंतर त्या ठिकाणचे दारू निर्मिती पूर्णपणे बंद होणे आवश्यक असताना आजही मोठ्या प्रमाणात दारु गाळण होत असते. हे पोलिसांचे अपयश म्हणावे काय? असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

----

अड्डे उद्धवस्त करु: गायकवाड

उत्तर पोलीस ठाण्याचा पदभार मंगळवारी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी स्वीकारला आहे. निवडणुकीच्या कामामुळे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होती. आता नियोजन करुन तालुक्यातील हातभट्टी अड्डे उद्धवस्त करण्यासाठी मोहीम आखली जाईल. शिवाय कोरोनाचा काळ असल्याने हातभट्टी तयार करताना एकत्रित येणाऱ्या लोकांची संख्याही अधिक असते. ती होऊ नये यासाठी खबदारी घेण्याची ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी दिली.

Web Title: Maharashtra's furnace to Karnataka overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.