अध्यात्माच्या मार्गावर असणार्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:23 PM2021-03-10T13:23:43+5:302021-03-10T13:23:49+5:30
प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो.
प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.
अध्यात्माच्या मार्गावर असणार्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात.
परंतु योगी व्यक्तींसाठी, हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले – अतिशय स्थिर. योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.