महात्मा गांधीजींचा अद्भुत प्रभाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:26 AM2019-01-30T11:26:27+5:302019-01-30T11:27:24+5:30
माणूस जन्माला येतो आणि कालांतराने जगाचा निरोप घेतो. पण काही जण आपल्या जीवनात असे कार्य करतात की, आयुष्य संपल्यानंतरही ...
माणूस जन्माला येतो आणि कालांतराने जगाचा निरोप घेतो. पण काही जण आपल्या जीवनात असे कार्य करतात की, आयुष्य संपल्यानंतरही त्यांचा प्रभाव त्या देशाच्या सर्वसामान्यांवर कायमचा कोरला जातो. त्यांचा प्रभाव कोठे आणि कोणत्या परिस्थितीत कसा जाणवेल ते कोणीही सांगू शकत नाही. असाच अनुभव मी प्रत्यक्ष माझ्या जीवनात अनुभवला असून, मी तो क्षण माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.
गोष्ट १९८८-८९ ची असेल. त्या काळी सोलापूर येथील कल्पना टॉकीजमध्ये सदर प्रसंग घडलेला होता. त्या काळात सदर ठिकाणी एकूण एक सरस इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होत होते आणि प्रेक्षकही भरपूर दाद द्यायचे. एकेदिवशी दुपारी साडेतीनच्या खेळाला मी सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी गेलो. थिएटर भरलेले होते आणि चित्रपट सुरू होण्याअगोदर तेथे भारतीय समाचार चित्र चालू होते. त्यास लोक इंडियन न्यूज म्हणून संबोधायचे.
यावेळी गांधीजींची दांडी यात्रा यावर आधारित चित्रपट सुरू होता व तो दोन भागांचा असल्याने लोक कंटाळले होते. हळूहळू लोकांनी थिएटरमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि ते चालू चित्र समाचार बंद करून मूळ सिनेमा चालू करण्यासाठी गोंधळ घालू लागले. त्या समाचार चित्रातही एका सभेच्या ठिकाणी मंचावर गांधीजी बसलेले असताना लोक गोंधळ घालत असतानाचे चित्रण होते. गांधीजी त्या लोकांना हात उंचावून गप्प बसण्याची ताकीद देत होते.
तो प्रसंग पाहून थिएटरमधील प्रेक्षक अजून गोंधळ करू लागले आणि इतक्यात कॅमेरा गांधीजींवर फोकस होऊन ते तोंडावर बोट ठेवून सर्वांना शांत बसण्याचे संकेत देताच थिएटरमधील प्रेक्षकांत प्रचंड हंशा पिकला. चित्रपटातील लोकही शांत झाले आणि थिएटरमधलेही लोक गप्प बसून सदर समाचार पत्र पाहू लागले. त्यानंतर मात्र कोणीही ब्र काढला नाही आणि पूर्ण चित्रपट संपल्यानंतर मुख्य चित्रपट सुरू झाला.
मी अवाक् झालो आणि विचार केला. गांधीजी निरोप घेऊन चाळीस वर्षे झाली असतील, पण आजही त्यांचा प्रभाव जनमानसावर कसा कायम आहे. तो प्रसंग त्यांचे महान होण्याचे एक छोेटेसे प्रमाण असून, आजही मी तो प्रसंग अनेकदा अनेकांना ऐकविला आहे. पण माझ्या मनातील चलबिचल, कालवाकालव तीस वर्षे झाली तरी ती गोष्ट, तो क्षण माझे मन विसरायला तयार नाही.
कारण, गांधीजी हे आम्हा भारतीयांच्या मनात आणि रोमारोमात भिनलेले असून, त्यांच्या छबीच्या एका इशाºयाने आम्ही गप्प बसतो, यापेक्षा त्यांचे महात्म्य किती विशाल आणि भक्कम होते, हे नमूद करण्यासारखे आहे.
असले क्रांती राजकारण, कटकारस्थान यामुळे त्यांना आयुष्यातून उठविण्यात आले. असे भ्याड कृत्य करणारे लोक हे विसरतात की माणूस मरतो, विचार मरत नाहीत. जोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, तो सदा पिढ्यान्पिढी जिवंत राहणार आहे.
भारतीय जन अमर रहे! गांधीजी अमर रहे!! भारत देश अमर रहे जय हिंद !!!
- वाय. एम. बेग
(लेखक कामगार चळवळीचे अभ्यासक आहेत.)