पहिल्या चाचणीत महाविकास आघाडी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:19+5:302020-12-07T04:16:19+5:30
पंढरपूर येथे आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ...
पंढरपूर येथे आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, सुधीर अभंगराव, महावीर देशमुख, संदीप केंदळे, लंकेश बुराडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इएमव्ही मशीन नव्हती. मतपत्रिकेवर मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांचा कल कुणाकडे आहे, हे कळाले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या भाजपच्या पारंपरिक जागेवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे; मात्र स्वतःच्या पक्षात काही पडझड होऊ नये. पक्ष सोडून कोणी जाऊ नये. यासाठी महाराष्ट्रावर पुन्हा भाजपचे सरकार येणार, महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा कांगावा भाजप करत असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पोलीस सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई
चंद्रभागा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. या वाळू चोरीच्या व्यवसायात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी उपलब्ध झाल्या आहेत. वाळू चोरी हा महसूलच्या अखत्यारीतील विषय आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बैठक घेऊन वाळू चोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करू. कारवाईसाठी महसूल विभागाला पोलीस प्रशासन सहकार्य करेल. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावू
पंढरपूर येथे ब्रिटिशकालीन बांधलेली पोलीस वसाहत आहे. त्या पोलीस वसाहतीची दुर्दशा झाली आहे. यामुळे पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पोलिसांना राहण्यासाठी चांगले घरे मिळावे. पोलीस वसाहतीत सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी केली होती. या मागणीवर पंढरपूरच्या पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकर मार्गी लावू असे देसाई यांनी सांगितले.
फोटो लाईन ::::::::: ०६पंड०१
पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.