माहेरच्यांनी सिझरचे पैसे न दिल्याने बाळ हिसकावले, 2.5 महिन्यांनी माय-लेकराची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:30 PM2022-03-21T13:30:04+5:302022-03-21T13:30:38+5:30
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सुभाषनगर भागातील एका मुलाचे लग्न तारापूर (ता. पंढरपूर) येथील एका मुलीशी झाला
सोलापूर/बार्शी : माहेरच्या लोकांनी सिझरचा खर्च दिला नाही म्हणून सुनेपासून नवजात शिशूला हिसकावून घेऊन आई-वडिलांकडे पाठवून दिल्याचा प्रकार घडला. यानंतर बार्शीच्या रणरागिणी महिला ग्रुप आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने अडीच महिन्यांनी आईची व बाळाची भेट घडवून आणली. बार्शी शहरात सुभाषनगर भागात हा प्रकार घडला. एका कुटुंबीयांनी सुनेच्या सिझेरियनसाठी ६० हजार रुपये खर्च केला. हा खर्च तिच्या माहेरच्या लोकांनी दिला नाही म्हणून नवजात शिशूला तिच्यापासून हिसकावून घेतले. त्यानंतर तिला माहेरी पाठवून दिले.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सुभाषनगर भागातील एका मुलाचे लग्न तारापूर (ता. पंढरपूर) येथील एका मुलीशी झाला. बाळंतपणाच्या वेळी सिझर करून प्रसूती करावी लागली. सिझरचा खर्च हा पीडित महिलेच्या आई वडिलांनी द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. माहेरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. सासरच्या लोकांनी पीडित महिलेकडून तिचे बाळ हिसकावून घेतले.
त्यानंतर सुनेने बाळाची मागणी करूनही दिले जात नव्हते. त्या मातेने बार्शी येथील रणरागिणी महिला ग्रुपकडे व्यथा मांडली. संबंधित महिलांनी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. त्यांनी तत्काळ सुभाषनगर पोलिसांशी संपर्क साधला. येथील पोलिसांनी पाठपुरावा सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक सिरसाट, महिला ग्रुपच्या संजीवनी बारंगुळे, सुनीता जाधव, वैशालीताई ढगे हे तेथे जाऊन ते बाळ आईच्या ताब्यात दिले. चक्क अडीच महिन्यांनी आई आणि बाळाची भेट झाली.