माहेरवाशीण आशाबाई माढेंनी भागविली गावाची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:43 PM2019-04-22T15:43:28+5:302019-04-22T15:46:45+5:30
दुष्काळग्रस्त डोंबरजवळगेत मुंबईत वसलेल्या आशाबार्इंनी स्वखर्चातून मारली बोअरवेल
शंभूलिंग आकतनाळ/ विजय विजापुरे
चपळगाव /बºहाणपूर : लग्नानंतर सासरी गेलेली स्त्री संसाराच्या जबाबदारीत अडकून पडते. परंतु माहेरी, माहेरच्या गावावर संकट आल्यानंतर निवारणासाठी धावून येणारी माहेरवाशिण क्वचितच पाहायला मिळते. डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) या गावच्या आशाबाई माढे (आता सासरी मुंबईत वसलेल्या) यांनी माहेरच्या गावावर असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चातून चक्क बोअरवेल मारून दिली. विशेष म्हणजे यास तब्बल तीन इंच पाणी लागल्याने डोंबरजवळगेच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आधार मिळाला आहे.
डोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्या दोन-तीन महिन्यांत आपल्या माहेरी डोंबरजवळगेला येत असतात. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते. जनावरांचेही हाल सुरू आहेत.
शुक्रवारी आशाबाई माढे डोंबरजवळगेला आल्या असता त्यांनी ही परिस्थिती पाहिली. तत्काळ बोअरवेलची गाडी मागविण्यात आली अन् ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराच्या आवारात बोअर मारण्यास प्रारंभ केला. याला यश आले. १०० फुटांपासून ३६० फुटांपर्यंत जवळपास तीन इंच पाणी लागले. पाणीटंचाईत होरपळणाºया गावक ºयांच्या चेहºयावरही पाणी आले.
एका माहेरवाशिणीने अख्ख्या गावाची तहान भागविण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कार्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दयानंद पवार, निलप्पा पाटील, हिरामणी नारायणकर, मल्लिनाथ चौधरी, अंबणप्पा दुलंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंबरजवळगे या माझ्या माहेरगावाला अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. मी माहेरी येते त्यावेळी पाणीटंचाईचे रूप उग्र होताना पाहिले. आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून शुक्रवारी बोअर मारले. ग्रामदैवत महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मुबलक पाणीही लागले. ग्रामस्थांचा वनवास मिटावा हीच भावना आहे.
- आशाबाई माढे