महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी; बंडखोरी केल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:16 PM2019-10-11T13:16:02+5:302019-10-11T13:17:07+5:30
कोठे गटाचे अनेक नगरसेवक युतीच्या प्रचारात सक्रिय; उध्दव ठाकरे यांच्या सभेपूर्वी निर्णय
सोलापूर - शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी कोठे गट फोडण्याच्या हालचाली तीव्र केल्या असून अनेक नगरसेवक कोठे यांची साथ सोडण्याच्या तयारी असल्याचे वृत्त आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने इच्छूक होते. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी दिलीप माने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. दिलीप माने यांच्या प्रचारासाठी सोलापुरात जाहीर सभा घेण्याची तयारी दाखविली. १४ आॅक्टोबर रोजी उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सेनेचा निर्णय मान्य नसल्याने महेश कोठे यांनी बंडखोरी करुन उमेदवारी कायम ठेवली. उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महेश कोठे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेत शिवसेनेचे २१ नगरसेवक आहेत. यातील १९ नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा महेश कोठे यांनी केला होता. स्वतंत्र गट निर्मितीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. परंतु, यातील अनेक नगरसेवक दिलीप माने यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कोठे गटाचे काही नगरसेवक दिलीप माने यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्कात आहेत. कोठे गटाचे अनेक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय झाल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.