‘मध्य’ मध्ये बंडखोरी कायम करत महेश कोठेंनी दिले ‘युती’ला ‘उत्तर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 03:47 PM2019-10-08T15:47:30+5:302019-10-08T15:49:00+5:30
शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा; माघारीसाठी ‘मातोश्री’हून केले गेलेले प्रयत्नही निष्फळ
सोलापूर : शहर मध्यमधून अर्ज माघारी घेण्याकरिता महेश कोठे यांच्यावर सोमवारी अनेकांकडून दबाव होता; मात्र ते शेवटपर्यंत उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम राहिले़ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी कोठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी कोठे यांना मध्य मधून नको ‘उत्तर’मधून लढा असा आग्रह धरला मात्र कोठे यांनी भाजप-सेनेच्या युतीला शहर उत्तरमधून माघार घेत ‘उत्तर’ दिल्याचे दिसून आले.
शहर मध्यमधून महेश कोठे निवडणूक लढविणार का याकडे सोमवारी सर्व राजकीय मंडळींचे लक्ष लागले होते. सेनेने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून ते अस्वस्थ होते. त्यामुळे शहर मध्यमधून त्यांनी माघार घ्यावी असा आग्रह सुरू होता.
मातोश्रीवरून याबाबत निरोप येत होते. खासदार राहुल शेवाळे हे त्यांच्या संपर्कात होते असे सांगण्यात आले. स्थानिक नेत्यांनी त्यांना उत्तरमधून लढा असा आग्रह केला. पण कोठे यांनी दुपारपर्यंत कोणालाच प्रतिसाद दिला नाही़ परंतु त्यांनी दुपारी पावणेतीन वाजता शहर उत्तर मतदारसंघातून माघार घेतली़ त्यांनी या मतदार संघातून माघार घेतल्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.
त्याचबरोबर शहर मध्य मध्ये केलेल्या बंडखोरीचा परिणाम होणार असल्याने ‘मातोश्री’वरुन कारवाई होण्यापूर्वीच कोठे यांनी सोमवारी दुपारी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष सचिवाकडे पाठवून दिला.त्यांच्या या निर्णयाने बंडखोरी करण्याबाबत ते किती आक्रमक झाले आहेत, याची चर्चा दिवसभर सुरू होती़ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
कोण कोणाच्या पाठीमागे?
- प्रभाग ९ मधील भाजपचे नगरसेवक अविनाश बोमड्याल हे महेश कोठे यांचे भावजी आहेत़ त्यामुळे बोमड्याल हे आता युतीचा धर्म पाळणार की त्यांच्या परिवाराच्या बाजूने राहणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आत्तापर्यंत मात्र ते उघडपणे कोठे यांच्या कार्यक्रमांत दिसलेले नाहीत़ तसेच भाजपच्या नगरसेविका श्रीकांचन यन्नम याही त्यांच्या पाहुण्या आहेत़ त्यांचा कल युतीकडे की कोठे यांच्याकडे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपचे काही नगरसेवक सोमवारी सेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या बँकेतील बैठकीला गेले होते. युतीचा धर्म पाळण्याचा या बैठकीत निर्धार झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता कोण कोणाच्या पाठीमागे आहे हे लवकरच दिसून येणार आहे.
सर्व्हेच्या आधारामुळे ठाम
विधानसभा कोठून लढवावी यासाठी आधीच मी दोन मतदारसंघाचे सर्वेक्षण केले होते अशी माहिती महेश कोठे यांनी दिली़ उत्तर व मध्यमधून केलेल्या सर्व्हेमध्ये बहुतांश लोकांनी मध्यबाबत कौल दिला आहे. आता बदलेली परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांच्या विरोधातील मंडळीनी मला उत्तरमधून उभे राहण्याबाबत आग्रह केला. पण उत्तरमध्ये माझी यंत्रणा नसल्याने शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.