मका, तेल, दूध भुकटी अध्यादेशाची केली होळी
By दिपक दुपारगुडे | Published: June 30, 2024 08:36 PM2024-06-30T20:36:52+5:302024-06-30T20:37:06+5:30
केंद्राच्या अध्यादेशाविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर
सोलापूर: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. या अन्यायकारक अध्यादेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या केंद्राच्या निर्णयाचा परिणाम थेट दूध, मका आणि तेलबियांच्या दरावर होणार आहे. दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झाले आहेत.
या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयांपर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत केंद्राचा अध्यादेश जाळण्यात आला. केंद्र सरकारने १० हजार टन दूध भुकटी ५ लाख टन, मका ३ लाख, कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला. या निर्णयाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या अध्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी सचिन शेंडगे, तुकाराम काळे, सुदाम शेंडगे, दादासाहेब काळे, उमेश भाकरे, तात्यासाहेब काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
---
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तत्काळ मागे घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- अजित बोरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना