मजरेवाडी जि़ प. शाळेवरील पत्रे उडाले
By admin | Published: May 28, 2014 01:37 AM2014-05-28T01:37:38+5:302014-05-28T01:37:38+5:30
५ वर्ग खोल्यांसह पोषण आहार : मुख्याध्यापकांचे कार्यालय उघड्यावर
सोलापूर : मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वार्याचा फटका सर्वसामान्यांच्या घरांबरोबर मजरेवाडीतील जि़ प़ शाळेला बसला आहे़ शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून जाऊन पाच वर्ग खोल्यांसह पोषण आहार आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय उघड्यावर आले असून आजच्या घटनेने शाळा इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वार्याचा पाऊस झाला़ मजरेवाडीतील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक कार्यालय, पाच वर्ग खोल्या आणि पोषण आहार खोलीवरील पत्रे उडून जाऊन सारे काही उघड्यावर आले आहे़ हे पत्रे दुसरा पाऊस येण्यापूर्वी बदलले नाहीत तर पोषणआहाराची नासाडी तर होणारच आहे, शिवाय तडा गेलेल्या भिंतीही कोसळणार आहेत़ परिणामत: काही दिवसात भरणारी शाळा ही मैदानावर उघड्यावर असेल़ या शाळेच्या बाजूला राहणार्या रहिवासी रईसा शेख यांना शाळेवरचे पत्रे उडताना दिसले़ पत्र्यावरचा मोठा दगड पडल्याने मुख्याध्यापकांच्या टेबलावरील काचेचे तुकडे-तुकडे झाले़ तसेच काही कागदपत्रे आणि दफ्तर भिजल्याचे निदर्शनास आले़ ही घटना शेजार्यांकडून कळताच मुख्याध्यापिका खुर्शिद शेख, बालवाडी शिक्षिका विनू गोफणे, मदतनीस मंजुषा गळवे या धावत आल्या़ शिपायाच्या मदतीने सारे साहित्य, दफ्तर आणि पोषण आहार बाजूला केले़ तसेच रात्रभर पाणी बाहेर काढून स्वच्छता करून घेतली़ २६ फे ब्रुवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेवरचे पत्रे अशाच प्रकारच्या वादळी वार्यात उडून विद्यार्थी जखमी झाले होते़ त्यामुळे इमारतीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता़ सुदैवाने शाळांना सुट्ट्या असल्याने सुभाषचंद्र बोस शाळेची पुनरावृत्ती टळली़
-----------------------------
इमारत दुरुस्तीसाठी निधी नाही जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा इमारती या ५० वर्षांपूर्वीच्या आहेत़ आज या शाळा धोकादायक बनल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांची कालमर्यादा संपली तरी अशा शाळांच्या इमारती पाडून नवे वर्ग बांधून द्यायला शासनाकडे पैसे नाहीत़ किरकोळ दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ५ हजार रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले जाते, मात्र मोठ्या दुरुस्तीसाठी पैसेच उपलब्ध होत नाहीत़ नियमानुसार पडझडीचे फोटो दिले तरी त्यासाठी खास निधी लवकर उपलब्ध होत नाही़ २००४ पासून वेतनेतर अनुदानच बंद असल्याने अनेक शाळा अडचणीत सापडल्या आहेत़ २००४ पासून शासनाने वेतनेतर अनुदान बंद केल्याने शाळांच्या देखभालीवर कोण खर्च करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय़
-------------------
जिल्ह्यातील जुन्या शाळांच्या दुरु स्तीबाबत काही दिवसांपूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यांच्यासाठी खास धोरण आखले आहे़ शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध होत आहेत़ त्यानंतर लगेच इस्टीमेटचा आधार घेऊन काम केले जाणार आहे़ तसेच गटशिक्षण अधिकार्यांमार्फत मजरेवाडी शाळेची माहिती घेऊन ती दुरुस्त करू. - राजेंद्र बाबर, शिक्षणाधिकारी़