नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मोठा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:21 PM2019-05-24T16:21:48+5:302019-05-24T16:23:22+5:30
लोकसभा निवडणुक ; अकलूजच्या सभेमुळे रणजित निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामींना मिळाली ताकद
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सोलापूर लोकसभेच्या मतदानापूर्व एक दिवस अगोदर झालेली सभा महत्त्वाची ठरली.
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि बारामतीच्या उमेदवार रंजना कुल यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अकलूज येथे सभा घेतली. या सभेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या सभेने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले.
माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने कोणतीही कसर ठेवली नव्हती. अकलूज येथील सभेस माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या सभेत मोदींनी केलेले आवाहन त्याचप्रमाणे त्यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा केलेला गौरव यामुळे निर्माण झालेले वातावरण शेवटपर्यंत कायम राहिले.
या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा सत्तेवर येणार असल्याचे कळाल्यानेच पवार यांनी माघार घेतली असल्याची टीका केली होती. त्यामुळे आपसूकच पवार विरोधकांमध्ये चांगला संदेश गेला.
मोदी यांच्या सभेला विरोध झाला असतानाही ही सभा झाली आणि त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर आणि डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी या दोघांना याचा मोठा फायदा झाला.
मुख्यमंत्र्यांची सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर, अकलूज, फलटण, अक्कलकोट येथे सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी विरोधकांना जोडण्याचे काम केले. त्याचा फायदा दोन्ही उमेदवारांना झाला. मुख्यमंत्र्यांना या मतदारसंघात विशेष रस होता.
पवारांची सभा
शरद पवार यांनीही दोन्ही मतदारसंघात सभा घेतल्या. टेंभुर्णी, करमाळा, सांगोला, फलटण, नातेपुते, सोलापूर या ठिकाणी सभा घेतल्या. मात्र या सभांचा फायदा दोन्ही उमेदवारांना म्हणावा तसा होऊ शकला नाही.
राज ठाकरेंची सभा
‘लाव रे व्हिडिओ’ म्हणून राज ठाकरेंनीही सोलापुरात सभा घेतली. त्याला प्रतिसादही जोरदार मिळाला होता. मात्र काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या मतांमध्ये त्याचे परिवर्तन होऊ शकले नाही. परिणामी हवा होऊ शकली नाही.