मिरवणुकीला फाटा देत स्मशानभूमीला स्वर्ग बनवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:32 PM2018-03-08T12:32:38+5:302018-03-08T12:32:38+5:30
कुर्डूत महाराज ग्रुपचा उपक्रम : पाण्याचीही सोय झाली
कुर्डूवाडी : मिरवणुकीवर विनाकारण खर्च होतो. तो खर्च विधायक कामांसाठी व्हावा, हा कानमंत्र घेत कुर्डू (ता. माढा) महाराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करुन त्या परिसराला जणू स्वर्गच बनवून टाकले आणि या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाद्वारे शिवरायांना अभिवादन केले.
स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली होती. वाढलेली झाडी आणि फांद्यांमुळे रस्ता अरुंद बनला होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाºयांना नाहक त्रास होत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. साधेपणाने शिवजयंती साजरी करुन स्मशानभूमीचे रुप पालटण्याचा निर्णय महाराज ग्रुपने घेतला.
या उपक्रमात ग्रुपचे अध्यक्ष विशाल जगताप, रवी साळुंखे, विजय जगताप, बालाजी कापरे, दीपक धोत्रे, वैभव जगताप, कुमार जगताप, सर्जेराव जगताप, सूरज चोपडे, विशाल रंदवे, अमोल पावणे, समाधान ढेकळे, अमोल पंडित आदी २० ते २५ वयोगटातील शिवप्रेमींनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मशानभूमीच्या सुधारणांबाबतचा त्यांनी प्रस्ताव मांडला. केवळ २० ते २५ वयोगटातील मुले एकत्र आली तर ते समाजप्रबोधन करू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण असून, कुर्डू व परिसरातील महाराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.