पीएफचे पैसे काढण्यासाठी बनावट दस्त करून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:18 AM2021-05-28T04:18:02+5:302021-05-28T04:18:02+5:30
बार्शी : मुलीच्या विवाहासाठी बार्शी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्या भविष्य निधीतील पैसे काढण्यासाठी ...
बार्शी : मुलीच्या विवाहासाठी बार्शी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्या भविष्य निधीतील पैसे काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेशाची बनावट कागदपत्रे तयार केली. ६ लाख ५० हजार रुपयांची शासनाची फसवणूक केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
ही घटना २६ एप्रिल २१ रोजी घडली. चौकशीनंतर ही बाब उघडकीस आल्याने याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नाना सोनवणे (सोलापूर) यांनी बार्शी शहर पोलिसांत डॉ. तानाजी शिवाजी खांडेकर, सहा. आयुक्त तालुका लघुवैद्यकीय चिकित्सालय (बार्शी) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. पोलिसांनी भादंवि ४२०,४६५ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांनुसार प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त पुणे कार्यालयाच्या लक्षात येताच ही बाब येताच त्यांनी उपकोषागार अधिकाऱ्यांना सूचित करून देयक रोखण्याची कार्यवाही करावी, असे मेलद्वारे तत्काळ प्रक्रिया करून २७ एप्रिल २०२१ रोजी देयक ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशी करताना डॉ. तानाजी खांडेकर यांनी लेखी जबाबात सांगितले की, मुलीच्या विवाहासाठी पैशाचीं गरज असल्याने १८ मार्च २०२१ रोजी प्रस्ताव सादर केल्यानंतर पुन्हा एकदा सादर केला होता. पाठपुरावा केल्यानंतर आदेश प्राप्त झाला होता परंतु तो चुकीचा असल्याने पुन्हा १६ एप्रिल रोजी प्रस्ताव सादर केला; पण कोविडच्या कारणाने प्रस्ताव पुणे येथे घेऊन जाणे शक्य नसल्याने वरिष्ठ कार्यालयाचे बनावट मंजुरी आदेशाचे पत्र २२ एप्रिल २०२१ रोजीचा जावक क्रमांक, सही करून २६ एप्रिल २०२१ रोजी मंजुरीसाठी उपकोषागार अधिकारी, बार्शी येथे सादर केले होते.
या प्रकरणी संपूर्ण चौकशीअंती प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे यांना अहवाल देण्यात आला. खांडेकर यांनी बनावट खोटे दस्तऐवज तयार करून भविष्य निर्वाह निधी देयक कोषागारातून पारित केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे शासनाची दिशाभूल, बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे आदेश आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दिले, असल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. तपास फौजदार कर्णेवाड करत आहेत.
----