विजयदादांना माळशिरसने तारले माढा मतदारसंघ :सदाभाऊंशी अटीतटीची लढत
By admin | Published: May 17, 2014 01:12 AM2014-05-17T01:12:00+5:302014-05-17T01:12:00+5:30
सोलापूर: राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते - पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यात अटीतटीची लढत झाली.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीला मिळालेल्या ३९०६९ मतांच्या मोठ्या आघाडीमुळे या लढतीत विजयसिंहांना २५३४४ मतांनी राष्टÑवादीचा गड राखता आला. देशभरातील प्रस्थापितांविरोधातील लाट माढा मतदारसंघातही असल्याचे विधानसभानिहाय मतमोजणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. येथील रामवाडी शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पावणेबाराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. तेव्हा सदाभाऊ यांनी विजयसिंहांवर ९७० मतांची आघाडी घेऊन आश्चर्याचा धक्का दिला. करमाळा (१४६२३), सांगोला (१४४७६) आणि फलटण (६०६) या विधानसभा मतदारसंघात खोत यांनी आघाडी घेतल्यामुळे राष्टÑवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता; पण माळशिरस विधानसभा मतदारसंघाने विजयसिंहांना साथ दिली अन् खोतांनी घेतलेली आघाडी तुटू लागली. विजयसिंहांनी माळशिरसमध्ये ३९०६९ मतांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतरच्या फेर्यांमध्ये राष्टÑवादीची आघाडी वाढत गेली. विजयसिंहांनी माढा (१४२२५), माण (१६५२)मध्ये आघाडी घेत सदाभाऊंना मात दिली. या मतदारसंघातील मतमोजणीच्या सहा फेर्यांमध्ये १०८०१८७ मते पात्र ठरली. त्यापैकी विजयसिंहांना ४८९९८९ मते तर सदाभाऊंना ४६४६४५ मते मिळाली. मोहिते - पाटील घराण्यात बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांना २५१८७ मते मिळविता आली. बहुजन समाज पक्षाचे कुंदन बनसोडे हे १५७९० मते घेऊन चौथ्या स्थानावर आले तर आम आदमी पक्षाच्या सविता शिंदे यांना केवळ ७१६० मते मिळाली.