वीस लाखाच्या खंडणीसाठी माळशिरस येथील डॉक्टर मुलाचे अपहरण; आठ तासात सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:06 AM2018-11-25T11:06:25+5:302018-11-25T11:09:21+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिसांची यशस्वी कामगिरी
माळशिरस : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डॉ. सिध यांच्या पाच वर्षीय ईशानचे २० लाख खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलाची सुखरूप सुटका केली तसेच तीन आरोपींना ताब्यातही घेतले आहे.
या प्रकरणात आणखीन पाच आरोपी असण्याची शक्यता आहे. यापैकी एक आरोपी डॉ. सिद यांच्या रुग्णालयात कपौंडर म्हणून काम करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
माळशिरस येथील डॉ.सिध यांचा मुलगा ईशानचे (वय ५ वर्षे) शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी अपहरण केले होते. त्याच्या तपासासाठी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी सहा. पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंजुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ३५३ उबाळे, पोलीस नाईक कांबळे, पोलीस नाईक औटी यांच्या पथकाने ईशानचा शोध घेऊन त्याला रात्री ११ वा माळशिरस पोलीस ठाण्यात सुखरूप आणुन आई वडिलांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून माळशिरस येथील २ सदाशिवनगर येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे तर अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ईशानला पोलिसांनी सतर्कतेने सुखरूप सोडवल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.