‘पुरुष वंध्यत्व’ प्रॉब्लेम कुणाचा...क़ुणावर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 03:20 PM2019-01-24T15:20:08+5:302019-01-24T15:20:43+5:30
माझी पत्नी अंजली, जी गायनेकॉलॉजिस्ट आहे. तिच्या ओपीडीत मी सहज म्हणून बºयाचदा डोकावत असतो. मनुष्य स्वभावाचे अनेक इरसाल नमुने ...
माझी पत्नी अंजली, जी गायनेकॉलॉजिस्ट आहे. तिच्या ओपीडीत मी सहज म्हणून बºयाचदा डोकावत असतो. मनुष्य स्वभावाचे अनेक इरसाल नमुने तिच्या ओपीडीत मला पाहायला मिळतात. सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. तिच्याकडे एका श्रीमंत घराच्या सुनेला तपासणीसाठी तिची सासू आणि नणंद घेऊन आलेले होते. तीन वर्षे झाली लग्न होऊन. पण पाळणा हलला नाही. त्यांना त्यांच्या वंशाला दिवा हवा होता. गरिबाघरची सुशिक्षित आणि सुंदर मुलगी सून म्हणून त्यांनी लग्न करून घरी आणलेली होती.
स्वभावाने साधी वाटत होती बिचारी. अंजलीने तपासले तिला आणि सांगितले की, तिच्यात काहीच दोष नाही म्हणून. तिच्या बºयाच तपासण्याही त्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या होत्या. त्याही नॉर्मलच होत्या. अंजलीने स्पष्टच सांगितले की, सून पूर्णपणे नॉर्मल असल्याने आता मुलाला तपासणीसाठी घेऊन या आणि सरांना दाखवा. ‘मॅडम, नीट तपासा की! बघा, हिच्यातच काही दोष असंल, सासूबाई बोलल्याच.
सून बिचारी हताश नजरेने सारे पाहत होती; पण अंजली ठाम होती. चौकशीअंती असे कळाले की, यापूर्वीच्या डॉक्टरांनीदेखील हेच सांगितले होते; पण प्रत्येकवेळी त्यांनी डॉक्टर बदलला होता. तरीपण अंजली आपल्या मतावर ठाम होती. ‘मॅडम भारी औषधे द्या; पण पाळणा लवकर हलेल असं बघा काहीतरी’ सासूबार्इंची भुणभुण चालूच होती; पण अंजलीने नि:क्षून सांगितले, ‘पुढच्या वेळी येताना मुलाला बरोबर घेऊन या, आता मात्र या मंडळींना पर्याय उरला नव्हता. पुढच्या वेळी सासू, नणंद आणि नवरा मुलगा ओपीडीत अवतरले; मी त्या मुलाला तपासले. तब्येतीने तो धडधाकट होता. त्यानंतर त्या मुलाला मी सोनोग्राफी आणि वीर्य तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा निर्लज्जपणे त्यांनी एक मोठी फाईल माझ्यासमोर ठेवली.
ज्यामध्ये दोघा नवरा-बायकोच्या केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट होते. सुनेचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते; परंतु मुलाच्या प्रत्येक रिपोर्टमध्ये दोष होता. याचाच अर्थ, त्या मुलाला स्वत:चे मूल होणे शक्य नव्हते. महत्त्वाचे म्हणजे या साºया गोष्टी त्या मुलाला, त्याच्या आईला आणि बहिणीला माहीत होत्या. मी म्हटलंही त्या तिघांना, तुम्ही काय डॉक्टरांच्या ज्ञानाची परीक्षा घेत आहात की काय? यावर ते तिघेही फक्त निर्लज्जपणे हसत राहिले.
आता हे स्पष्ट झाले होते की, त्यांना फक्त वंश चालविण्यासाठी मूल हवे होते. त्यानंतर मी आणि अंजलीने एकत्र बसून त्या तिघांनाही हे समजावून सांगितले की, या मुलापासून त्याच्या पत्नीला गर्भ राहणे शक्य नाही. तेव्हा एकच उपाय उरतो, तो म्हणजे आर्टिफिशियल इनसेमिनेशन डोनर. म्हणजेच दुसºया कुठल्या तरी पुरुषाचे शुक्रजंतू स्पर्म बँकेतून घेऊन ते त्यांच्या सुनेच्या गर्भाशयात सोडून गर्भधारणा घडवून आणणे आणि पुढे होणारे मूल आपले म्हणून वाढविणे. आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे की, फारशी कटकट न करता ते तिघे या गोष्टीला तयार झाले. कदाचित त्यांची मानसिक तयारी यापूर्वीच झालेली होती; पण एक महत्त्वाची अट त्यांनी आम्हाला घातली. सासूबाई म्हणाल्या, ‘डॉक्टर, हे करण्यासाठी आमची काहीच हरकत नाही; परंतु आमच्या सुनेला यातले काहीही कळता कामा नये. तिला आपण असेच सांगू की, हे शुक्रजंतू आमच्या मुलाचेच आहेत आणि मग गर्भधारणा घडवून आणू. माझ्या मुलाची आणि आमच्या कुटुंबाची नाचक्की व्हायला नको आहे आम्हाला.’ विचित्र अशी ही अट होती.
कारण, आर्टिफिशियल इनसेमिनेशन डोनर प्रक्रिया करताना पत्नी आणि तिच्या पतीचा कन्सेंट म्हणजेच लिखित परवानगी असणे अतिशय जरुरी असते. किंबहुना एखाद्या स्त्रीच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय आर्टिफिशियल इनसेमिनेशन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे ऐकल्यानंतर मात्र माझी सटकली. मी त्या सासूला विचारले, ‘तुमच्याबाबतीत किंवा तुमच्या बरोबर असलेल्या मुलीच्या बाबतीत असे केले असते तर ते तुम्हाला चालले असते का?’ आता मात्र बार्इंची बोलती बंद झाली. पुढच्यावेळी चुपचाप सुनेला घेऊन आल्या. सगळी गोष्ट सुनेला समजावून सांगितली आम्ही. बहुधा तिलादेखील नवºयाचे रिपोर्ट्स माहिती होते; पण ती गरीब गाय गुपचुप हा अन्याय सहन करीत होती.
आर्टिफिशियल इनसेमिनेशन डोनर या प्रक्रियेला ती तयारही झाली. प्रक्रिया संपल्यानंतर घरी जाताना तिच्या चेहºयावरचे भाव मात्र खूपच बोलके होते. या नालायक लोकांच्या पापात तुम्ही भागीदार झाला नाहीत, त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर, असेच जणू ती म्हणत होती.
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत)