हॉटस्पॉट रोखण्यासाठी माळीनगरचा आठवडा बाजार बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:11+5:302021-07-28T04:23:11+5:30
आठवडा बाजारास जिल्ह्यात बंदी असली तरी येथे दर सोमवारी दणक्यात आठवडा बाजार भरत आहे. तो तत्काळ बंद करण्याबरोबरच कोरोना ...
आठवडा बाजारास जिल्ह्यात बंदी असली तरी येथे दर सोमवारी दणक्यात आठवडा बाजार भरत आहे. तो तत्काळ बंद करण्याबरोबरच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार आहे.
माळशिरस तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यात माळीनगर आघाडीवर आहे. तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण येथे आहेत. त्यापैकी काहीजण गृह विलगीकरणात आहेत. माळीनगरमध्ये सोमवारचा आठवडा बाजार प्रचंड गर्दीने फुललेला दिसतो. आठवडा बाजारासाठी बाहेरून व्यापारी व आसपासच्या गावातील ग्राहक येथे येत आहेत. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा हा बाजार भरत असल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
----
माळीनगरमध्ये २७ कोविड रुग्ण होते. आता १९ आहेत. कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंडईच्या नावाखाली येथे बाजार भरत आहे. बाहेरील व्यापाऱ्यांना येथे येण्यास मज्जाव करणार आहोत. बाजारातील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
-अभिमान जगताप
सरपंच, माळीनगर
----
माळीनगरमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड रुग्ण कोविड केअर सेंटरला येऊन उपचार घेत नाहीत. घरीच थांबत असल्यामुळे रुग्णांची संख्या अधिकच वाढते. यात लोकांचे सहकार्य नाही. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन सहकार्य करावे.
- डॉ. संकल्प जाधव
वैद्यकीय अधिकारी, माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र