जानकरांचे १६ हजारांचे मताधिक्य तोडत भाजपचे राम सातपुते विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 05:01 PM2019-10-24T17:01:36+5:302019-10-24T17:04:59+5:30
Malshiras Vidhan Sabha Election Results 2019: माळशिरस विधानसभा मतदारसंघ; शेवटच्या क्षणी सातपुतेंनी विजयश्री आणला खेचून
माळशिरस : पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचे १९ व्या फेरीपर्यंत १६ हजार ५९७ मतांचे लिड होते, मात्र हे लिड तोडत भाजपचे राम सातपुते यांनी आघाडी घेत शेवटच्या ४ फेरीपर्यंत ती टिकविले आणि अखेर २७०२ मताधिक्यांनी विजयी झाले.
माळशिरसविधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मात्र मोहिते-पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला़ त्यानंतर मोहिते-पाटील गटाने आपला करिष्मा पक्ष बदलल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत दाखवून दिला. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या गटाचा उमेदवार विजयी होईल, असे चित्र होते. मात्र अखेरच्या क्षणी उत्तम जानकर यांनी भाजपशी फारक घेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली़ भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
२४ रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीतच उत्तम जानकर यांनी २ हजार ६०१ मतांची आघाडी घेतली. ती कायम ठेवत १२ व्या फेरीपर्यंत १६ हजार ६९७ मतांची आघाडी होती़ त्यानंतर १३ व्या फेरीनंतर त्यांच्या मतांची आघाडी कमी-कमी होऊ लागली़ १९ व्या फेरीत राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांच्यावर मात करीत ८५६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी अखेरच्या २२ व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत केवळ २७०२ मतांनी विजयी झाले.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा निकाल सुरुवातीला उत्तम जानकर यांच्या बाजुने झुकत चालल्याने अकलूज, माळशिरस मध्ये सन्नाटा पसरला होता़ जेव्हा राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांची आघाडी तोडून पुढे गेल्यानंतर मात्र तालुक्यात सर्वत्र मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली.