खाकी वर्दीतली माणूसकी; स्वत:चीच मुलगी समजून त्या पोलिसांनी तिची ओटी भरून सासरी पाठवलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:59 PM2020-01-22T16:59:41+5:302020-01-22T17:04:07+5:30
मोडलेला संसार पोलिसांनी जोडला; अन् पत्नी नांदण्यास जाताना भारावले नातेवाईक
अशोक कांबळे
मोहोळ : पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरून एक वर्षापासून दुरावलेल्या त्या दाम्पत्याचे समुपदेशन केले़ त्यानंतर मुलीला सासरी पाठविताना मोहोळपोलिसांनी साडी-चोळी देऊन बोळवण करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
चौसाळा (ता. जि. बीड) येथील सासरकडील सासू छाया सुभाष बारवकर, सासरे सुभाष त्रिंबक बारवकर, पती विकास सुभाष बारवकर, जाऊ नीता मनोज बारवकर, नणंद सोनाली आनंद निनाळे हे सर्व जण माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून छळ करीत होते़ तसेच सोडचिठ्ठी दे म्हणून मानसिक त्रास देत होते, अशी तक्रार वैशाली विकास बारवकर (माहेर पाटकूल, ता़ मोहोळ) मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती़ या तक्रारीची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पीडित महिलेसह त्यांचे नातेवाईक व पतीकडील मंडळींना बोलावून घेतले.
महिला पोलीस कर्मचारी अनुसया बंडगर यांनी माहिती घेऊन पती-पत्नीमधील भांडणाचे कारण सूर्यकांत कोकणे यांच्या निदर्शनास आणून दिले़ त्यानंतर त्यांनी पती-पत्नीसह त्यांच्या दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केले़ कोकणे व बंडगर यांच्या समुपदेशनामुळे पती-पत्नीमध्ये झालेले समज, गैरसमज दूर झाले़ एक वर्ष त्यांच्यामध्ये निर्माण झालेले अंतर क्षणात नाहीसे झाले आणि वैशाली नांदण्यास जाण्यास कबूल झाली़ पती-पत्नीसह दुरावलेला परिवार एकत्र आला.
हा प्रसंग पाहून सूर्यकांत कोकणे यांनी तालुक्यातील मुलगी आहे म्हणून तिला पोलीस ठाण्यातच मुलीप्रमाणे साडी-चोळी देऊन बोळवण करून तिच्या सासरकडील लोकांबरोबर नांदण्यास जाण्यासाठी २० जानेवारी रोजी पाठवून दिले. तेव्हा दोन्ही परिवारांनी आनंदाश्रू काढत पोलिसांचे आभार मानले़
मोडलेला संसार पुन्हा जोडला
- पती-पत्नीमधील किरकोळ भांडणामुळे माझ्या भावाच्या मुलीचा मोडलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले़ त्यामुळे ते अधिकारी नसून त्या मुलीचे वडील आहोत, अशी आत्मीयता पोलिसांनी दाखवली़ इतकेच नाही तर स्वत:चीच मुलगी समजून तिची ओटी भरून पाठवले. पोलीस खात्यात काम करताना अशाच प्रकारची भूमिका सर्व अधिकाºयांनी घेतली तर भविष्यात किरकोळ कारणावरून होणारे घटस्फोट, मोडणारे संसार पुन्हा जोडण्यास निश्चित मदत होईल, अशा भावना मुलीचे चुलते संभाजी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.