मुसळधार पावसामुळे कठडा नसलेल्या पुलावरून वाहून गेला माणूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:09+5:302021-06-04T04:18:09+5:30
करमाळा शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील कुंभारवाड्यातील ओढ्याला पूर आला. त्यावेळी पुलावरून जात असलेली ...
करमाळा शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील कुंभारवाड्यातील ओढ्याला पूर आला. त्यावेळी पुलावरून जात असलेली एक व्यक्ती कठडे नसलेल्या पुलावरून पाय घसरून ओढ्यात पडली. जोरदार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली, असे कुंभारवाड्यातील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
अज्ञात व्यक्ती असल्याने बुधवारी रात्री कोणी याकडे लक्ष दिले नाही; पण गुरुवारी सकाळी अण्णाभाऊ साठेनगरातील सूर्यकांत तुकाराम मंंडलिक (वय-५७) हे बुधवार रात्री व आज सकाळी घरी आले नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला असता ते दुपारपर्यंत आढळून आले नाहीत. यामुळे त्यांच्या नातलगांनी करमाळा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे.
घटनास्थळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार यांनी भेट दिली व कुंभारवाडा पुलापासून थेट प्रधान ओढ्यापर्यंत त्या वाहून गेलेल्या व्यक्तीचा जेसीपीच्या साहाय्याने दुपारपर्यंत शोध घेतला. त्यानंतर रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, दलित सेनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण भोसले, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, सुहास ओहोळ आदींसह पंधरा-वीस जणांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला.
---
पुलास कठडे असते, तर जीव वाचला असता
कुंभारवाड्यातील ओढ्यावरील पूल तीस वर्षांपूर्वीचा आहे. त्या पुलावरून शहरातील मुलाणीवाडा, नागोबा मंदिर, सुमंतनगर त्याशिवाय हिवरवाडी, भोसे, रावगाव या गावांकडे जाणारे ये-जा करतात. पाच वर्षांपासून पुलाचे कठडे गायब होऊन पूल धोकादायक बनला होता. कठडे नसल्यानेच पुलावरून ती व्यक्ती पाण्यात वाहून गेली व मरण पावली.
----
फोटो ओळी : ओढ्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेताना नागेश कांबळे व कार्यकर्ते.